पोलिओ डोसऐवजी पाजले सॅनिटायझर, १२ बालके रुग्णालयात, यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:55 IST2021-02-02T04:11:09+5:302021-02-02T06:55:13+5:30
Yavatmal News : पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला.

पोलिओ डोसऐवजी पाजले सॅनिटायझर, १२ बालके रुग्णालयात, यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार
यवतमाळ - पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला. सॅनिटायझर पाजलेल्या १२ बालकांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बालकांना कसलाही त्रास नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
भांबेरा आरोग्य केंद्रांतर्गत कापसी अंगणवाडीत पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू असताना तेथे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व डॉक्टर गावंडे उपस्थित होते. मुलांना पोलिओ डोस देणे सुरू असल्याची पाहणी करण्यासाठी सरपंच युवराज मरापे तेथे पोहोचले.
त्यांनी कुतूहलापोटी पोलिओ डोसची बाटली उचलून पाहिली, तेव्हा ते सॅनिटायझर असल्याचे आणि तेच मुलांना पाजले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ लसीकरण थांबविले. ज्या मुलांना डोस दिले गेले, त्यांना तत्काळ परत बोलावून घेण्यात आले. झालेल्या प्रकाराची माहिती पारवा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
सॅनिटायझर दिलेल्या १२ मुलांना सुरक्षितता म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या गंभीर प्रकाराची माहिती होताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन बालकांची विचारपूस केली.
डॉक्टरसह तिघांची सेवा समाप्त
दरम्यान, या प्रकरणात तेथील वैद्यकीय अधिकारी (सीएचओ), आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका या तीन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. याशिवाय वरिष्ठ डॉक्टरांवरही निलंबनासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाण्याचे संकेत त्यांनी दिले. भंडारा येथील दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठ डॉक्टरांना सोडता कामा नये, असे मत व्यक्त केले जात आहे.
पोलिओऐवजी सॅनिटायझर दिलेल्या १२ मुलांना बालरोग विभागात दाखल केले आहे. यातील कुणालाच कुठला त्रास नाही. सर्व मुले ठणठणीत आहेत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
- डॉ. सुरेंद्र भुयार, अधीक्षक, शासकीय रुग्णालय, यवतमाळ