वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:50 PM2020-02-27T14:50:18+5:302020-02-27T14:51:29+5:30

रेती तस्करांचा उच्छाद, वाहन पेटविणारे सीसीटीव्हीत कैद - घाटंजी येथील घटना

Sand smugglers lined the vehicle in front of the Tehsildar's house in yavatmaal | वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं

वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं

Next

घाटंजी (यवतमाळ) : येथील तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर उभे ठेवलेले एका तलाठ्याचे चारचाकी वाहन पेट्रोल टाकून पेटविण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री १.१५ वाजताच्या सुमारास घडली. वाहन पेटविणारे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांनी अवैध रेती तस्करीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. रात्री-अपरात्री महसूल पथकासह त्या पेट्रोलिंग करीत आहे. बुधवारी रात्री त्या तलाठी पवन बोंडे यांच्यासह इतर तीन ते चार तलाठ्यांना घेऊन अवैध रेती तस्करीची वाहने पकडण्याच्या मोहिमेवर गेल्या होत्या.

पथकातील तलाठी पवन बोंडे यांनी आपले चारचाकी वाहन (एम.एच.३२/वाय.०५३९) तहसीलदार माटोडे यांच्या अंबानगरी येथील निवासस्थानासमोर उभे ठेवले होते. तसेच पथकातील इतर तलाठ्यांनीही आपल्या दुचाकी तेथेच ठेवल्या होत्या. महसूलचे पथक तहसीलदारांच्या शासकीय वाहनाने पेट्रोलिंगवर गेले होते. मात्र अचानक रात्री १.१५ वाजताच्या सुमारास काही भामट्यांनी बोंडे यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार माटोडे व त्यांचे पथक घरी परतले. तोपर्यंत वाहन पूर्ण जळून खाक झाले होते. 

विशेष म्हणजे, या घटनेपूर्वी एका अज्ञात इसमाने तहसीलदारांच्या वाहनावरील चालकाला मोबाईल केला होता. त्याने मॅडम कुठे आहे, असा प्रश्न विचारला. तसेच मी पत्रकार नखाते बोलतो, असे सांगून फोन बंद केला. भामट्यांनी तहसीलदारांचे लोकेशन घेऊन नंतर वाहन पेटविल्याचे यावरून दिसून येते. महसूलने रेती माफियांविरुद्ध मोहीम सुरू केल्याने त्यातूनच वाहन पेटविल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेती तस्करांनी सूड घेण्याच्या उद्देशाने वाहन पेटविले असावे, असा अंदाज तलाठी बोंडे यांनी वर्तविला. दरम्यान, वाहन पेटविणारे दोन इसम तहसीलदार माटोडे यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेने महसूलचे अधिकारी, कर्मचारी किती असुरक्षित आहे, हे दिसून येते.

Web Title: Sand smugglers lined the vehicle in front of the Tehsildar's house in yavatmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.