Review from Commissioner, Inspector General | आयुक्त, महानिरीक्षकांकडून आढावा

आयुक्त, महानिरीक्षकांकडून आढावा

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाची स्थिती : खाद्य तेल, भाजीपाला चढ्या भावाने विकण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आयुक्तांसोबतच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हेसुद्धा जिल्ह्यात दाखल झाले.
आयुक्त व महानिरीक्षकांनी तेलंगाणा राज्य सीमेवरील पाटणबोरी (ता. पांढरकवडा) येथे भेट देऊन स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या सोई-सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार उपस्थित होते. तेथील मजुरांशी व्यवस्थेबाबत संवाद साधला. या मजुरांनी समाधानही व्यक्त केले. पांढरकवडा येथील सहायक उपजिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपलब्ध व्यवस्थेची आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी येथे विविध विभागांची आढावा बैठक घेतली. जीवनावश्यक वस्तू आणि विशेषत: खाद्य तेल, भाजीपाला चढ्या भावाने विकले जाऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
औषधी, अन्न-धान्य कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी घ्या, ठोक विक्रेत्यांशी संपर्क करून साठ्याबाबत माहिती ठेवा, नाशवंत वस्तू सुरक्षित राहतील याची काळजी घ्या अशा सूचना आयुक्तांनी केल्या. स्वस्त धान्य दुकानात होणारी गर्दी लक्षात घेता दरदिवशी ठराविक लोकांना बोलावून धान्याचे वाटप करण्यास सांगण्यात आले. कोरोना रुग्णांची सद्यस्थिती, त्यांचे अहवाल, त्यांच्यासाठी उपलब्ध उपचार कक्ष, औषधी, वैद्यकीय यंत्रणेसाठी साधन सामुग्री याचाही आढावा घेतला.

‘व्हीसी’साठी आयपीएस गेले वर्धेत
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शुक्रवारी यवतमाळात आले होते. येथे ते आढावा बैठक घेणार होते. त्यानंतर येथूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणार होते. परंतु यवतमाळच्या आयटी सेंटरमध्ये कनेक्टीव्हीटी नसल्याने महानिरीक्षकांना अखेर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी वर्धेला जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन हेसुद्धा महानिरीक्षकांसोबत वर्धेला गेल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Review from Commissioner, Inspector General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.