समायोजन टाळण्यासाठी शिक्षकांचा असाही फंडा

By Admin | Updated: May 14, 2014 02:03 IST2014-05-14T00:00:39+5:302014-05-14T02:03:07+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे कामाचे दिवस वाढविल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता समुपदेशनाच्या निमित्ताने अनेक भानगडी समोर येत आहेत.

To prevent adjustments, such funds are funded by teachers | समायोजन टाळण्यासाठी शिक्षकांचा असाही फंडा

समायोजन टाळण्यासाठी शिक्षकांचा असाही फंडा

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांचे कामाचे दिवस वाढविल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता समुपदेशनाच्या निमित्ताने अनेक भानगडी समोर येत आहेत. आरटीईनुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर गंडांतर येत आहे. यामुळे शिक्षकांसमोर अतिरिक्त होण्याचा पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता एखाद्या संघटनेचे उपाध्यक्षपद आणून बदली टाळण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब उघड झाली आहे.

नेर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सोनवाढोणा येथील शाळेवर हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रतीमा मिरासे या शिक्षिके वर अन्याय झाला आहे.

सोनवाढोणा येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेतील दोन शिक्षक पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरलेत. त्यामुळे आपले रोडवरचे गांव हातातून निघून जाईल, या भीतीपोटी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष असल्याचा फंडा वापरण्यात आला. या शाळेवरील संगीता मस्के आणि स्मिता तिडके या शिक्षिका सेवाज्येष्ठतेनुसार बदलीपात्र होत्या. स्मिता तिडके या गेल्या सहा महिन्यांपासून पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदावर कायम आहे. त्यांनी उपाध्यक्ष असल्याचे पत्र यापूर्वीच जोडले आहे. मात्र काही जणांनी ऐनवेळेवर ुउपाध्यक्ष पदाचे पत्र जोडल्याची चर्चा आहे. उपाध्यक्षाची बदली करता येत नाही, ही बाब लक्षात येताच इतरही शिक्षकांनी बदलीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष असल्याचे पत्र आणले.

या सार्‍या प्रकाराचा फटका प्रतीमा मिरासे यांना बसला. समायोजनासाठी ऐनवेळी त्यांना नेर पंचायत समितीमध्ये बोलविण्यात आले. ध्यानीमनी नसतांना समायोजनासाठी बोलविण्यात आल्यामुळे त्या संभ्रमात पडल्यात. कुठलेही पत्र न देता त्यांना फोन करून बोलविण्यात आल्यामुळे त्यांना समायोजनाचा नाहक फटका बसला आहे. प्रतीमा मिरासे यांना देण्यात येणारे गाव सोयीचे नसल्यामुळे त्यांनी मात्र गाव घेण्यास नकार दिला. या सार्‍या प्रकारामुळे नेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिक्षक बदली टाळण्यासाठी काय अफलातून आयडियावापरतात, याचा पुरावा मिळाला आहे.

नेर पंचायत समिती अंतर्गत ११ जणांचे समायोजन करण्यात आले. समायोजनात आपल्याला सोयीचे गाव मिळाले नाही तर त्रास होईल, यामुळे संघटनेचा उपाध्यक्ष असल्याचे पत्र जोडून स्वत:वरील बदलीचे संकट टाळण्यात बदलीपात्र शिक्षकांना तूर्तास यश आले आहे. या सार्‍या प्रकारामुळे मात्र सोनवाढोणा येथील शाळेवरील शिक्षिका प्रतीमा मिरासे यांना नाहक बदलीला सामोरे जावे लागले. मागील वर्षी अपंगाचे प्रमाणपत्र जोडून बदल्या टाळण्याचा प्रकार जिल्हा परिषदेमध्ये घडला होता. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: To prevent adjustments, such funds are funded by teachers