सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 11:43 IST2020-06-01T11:42:34+5:302020-06-01T11:43:01+5:30
लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली.

सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह
यवतमाळ: घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातच वृद्ध आईवडील आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. यातच पाचवा लॉकडाऊन घोषित झाल्याचे वृत्त येताच, खचलेल्या सुनील टेकाम (वय 35 वर्षे) रा. नरसाळा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील नरसाळा येथील टेकाम कुटुंबीयसुद्धा गेल्या अडीच महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने त्रस्त होते रोज मजुरी करून या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु मार्च महिन्यात कोरोनाने देश लॉकडाऊन झाला आणि पोट भरण्याचा प्रश्न आवासून समोर आला. सुरवातीला अनेक समाजसेवकांनी मदतीचे हात पुढे केले. परंतु हळूहळू मदतीचे हे हात लुप्त व्हायला लागले. आता आईवडील आणि मुलांना सांभाळायचं कस, हा न सुटणारा प्रश्न सुनीलला उपाशीपोटी अस्वस्थ करीत होता.
लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. राज्यात दररोज वाढणारा कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता कुटुंबाची वाताहात होणार, या विचाराने तो अस्वस्थ झाला. आणि त्याने अखेर आत्महत्येचा निर्णय घेतला. ३१ मे रोजी पाच वाजताच्या दरम्यान, मी गिट्टी खदाणीवर काम शोधून येतो, असे कुटुंबियांना सांगून त्याने घर सोडले आणि नामदेव दुर्गे या शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.