आरडी एजंटचा गळा चिरुन निर्घृण खून; पैशांवरून झाला होता वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 18:26 IST2022-02-11T18:24:39+5:302022-02-11T18:26:34+5:30
आरोपी हेमंत सुभाष पवार हा आरडीचे पास बुक घेऊन पैसे काढण्यासाठी प्रकाशकडे आला. गुरुवारी सायंकाळी दोघांमध्ये यावरून वाद झाला. झटापटही झाली.

आरडी एजंटचा गळा चिरुन निर्घृण खून; पैशांवरून झाला होता वाद
घाटंजी (यवतमाळ) : ग्रामीण भागात आरडी संकलन करणाऱ्या युवकाचा सुरीने गळा चिरुन खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली. आरडीच्या पैशांवरून वाद झाला. या वादात ओळखीच्याच व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. वर्मी वार बसल्याने आरडी एजंटचा जागीच मृत्यू झाला.
प्रकाश प्रेमदास राठोड (३४) रा. किन्ही असे मृत युवकाचे नाव आहे. तो आरडी एजंट म्हणून काम करीत होता. आरोपी हेमंत सुभाष पवार (१९) हा आरडीचे पास बुक घेऊन पैसे काढण्यासाठी प्रकाशकडे आला. गुरुवारी सायंकाळी दोघांमध्ये यावरून वाद झाला. झटापटही झाली.
नंतर हेमंत धारदार सुरी घेऊन आला. त्याच्यासोबत अमोल सुभाष पवार (२१), वीरेंद्र भीमराव राठोड (२९) हे दोघेही आले. या तिघांनी मिळून प्रकाशवर हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असतानाच हेमंतने प्रकाशच्या गळ्यावर, छातीवर सुरीने वार केले, यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळावरून तीनही आरोपी पसार झाले.
किन्हीसारख्या लहानशा गावात खुनाची गंभीर घटना घडल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. गुरुवारी रात्री ११ वाजता या प्रकरणी मृतकाचा काका भारत फुलसिंग राठोड याने दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार मनीष दिवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांना पांढरकवडा येथे पाठविण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास घाटंजी पोलीस करीत आहे.