अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला; अपघातात माय-लेक ठार

By विलास गावंडे | Published: September 12, 2022 06:36 PM2022-09-12T18:36:36+5:302022-09-12T18:41:33+5:30

उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली

mother and son killed as pick-up vehicle collided with bike | अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला; अपघातात माय-लेक ठार

अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला; अपघातात माय-लेक ठार

Next

डोंगरखर्डा (यवतमाळ) : अंत्यसंस्काराहून दुचाकीने गावी परतत असताना झालेल्या अपघातात मायलेकं ठार झाल्याची घटना पांढरकवडा मार्गावरील उमरी रोड येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सुरेखा महादेव बताले (४०) व शुभम महादेव बताले (२०) रा.डोंगरखर्डा ता. कळंब अशी मृतांची नावे आहे.

महादेव बताले यांच्या काकू ताईबाई नानाजी बताले (रा. किन्हाळा ता. पांढरकवडा) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे तिघेही गेले होते. रात्री महादेव बताले हे दुसऱ्या एका दुचाकीने समोर निघाले. तर सुरेखा व शुभम हे दोघे एम.एच.२९/ए.एफ.५३९५ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. दरम्यान, उमरी रोड जवळ एम.एच.२९/बी.यू.७८६३ या क्रमांकाच्या पीकअप वाहनाची धडक दुचाकीला बसली.

गंभीर जखमी झालेल्या सुरेखा व शुभमला नागरिकांनी उमरी रोड येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोघांनाही पोहोचण्यास उशीर होत असल्याने समोर निघालेले महादेव बताले हे काही अंतरावर थांबले. तेथून त्यांनी शुभमच्या मोबाईलवर कॉल केला. हा कॉल मदत करणाऱ्यांपैकी एकाने घेतला. त्यावेळी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तेथूनच ते रुग्णालयात पोहोचले.

डोंगरखर्डाची बाजारपेठ बंद

एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या अपघाती मृत्युमुळे सोमवारी डोंगरखर्डा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शोकाकुल वातावरणात शुभम व सुरेखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगी व आप्त परिवार आहे.

Web Title: mother and son killed as pick-up vehicle collided with bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.