कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:53+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.

Memories of the Rural Village of the Nations in the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची आठवण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची आठवण

googlenewsNext
ठळक मुद्दे६५ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा : ‘त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतची गेला’, सद्यस्थितीत ग्रामगीतेच्या विचारांची नितांत गरज

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून तब्बल ६५ वर्षांपूर्वी आत्ताच्या परिस्थितीचे वर्णन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनाच ग्रामगीतेची आठवण होऊ लागली आहे.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतर शासन व प्रशासन प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी करीत आहे. वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथातील ‘ग्राम आरोग्य’ या १४ व्या अध्यायात स्वच्छतेचे महत्व ६५ वर्षांपूर्वीच पटवून दिले.
‘चहू बाजूंनी केली घाण,
त्यात जंतू झाले निर्माण।
त्यातूनी रोगाच्या साथी भिन्न भिन्न,
वाढ घेती’.
कोरोनाने जगात धुमाकूळ घातला. प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. ‘ग्रामगीता’ ग्रंथातून १९५५ मध्येच राष्ट्रसंतांनी समाजाला जागृत केले होते. राष्ट्रसंत म्हणतात,
‘गाव असो अथवा शहर,
तेथील बिघडले आचार-विचार।
म्हणोनीच रोगराईने बेजार,
जाहले सारे जनलोक’.
कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’चा सल्ला दिला. राष्ट्रसंतांनी ‘ग्रामआरोग्य’ या अध्यायात
‘गाव व्हावया निरोगी सुंदर,
सुधारावे लागेल एकेक घर।
आणि त्याहूनि घरात राहणार,
करावा लागेल आदर्श’.
असे आधीच स्पष्ट केले होते.
कोरोना हळूहळू तिसऱ्या टप्प्यात सरकत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नजर ठेवून आहेत. विविध उपाययोजना केल्या जात आहे. आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा २४ तास परिश्रम घेत आहे. याची प्रचिती राष्ट्रसंतांनी ६५ वर्षांपूर्वीच आपल्या ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाला दिली आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात,
‘कशास काही नियम न उरला,
कोण रोगी कोठे थुंकला।
कोठे जेवला, संसर्गी आला,
गोंधळ झाला सर्वत्र।’.
त्याचप्रमाणे...
‘त्याने रोगप्रसार झाला,
लागट रोग वाढतचि गेला।
बळी घेतले हजारो लोकांला,
वाढोनि साथ।’.
यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार चिरंतन असून सर्वकाळी भारतीय समाजाला दिशादर्शक ठरणारे आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.

पंतप्रधानांना पाठविली ग्रामगीतेची हिंदी प्रत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.
 

Web Title: Memories of the Rural Village of the Nations in the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.