आगार सजणार, चालकांचा गौरव होणार; सुरक्षित वाहतूक, डिझेल बचतीचा सन्मान

By विलास गावंडे | Published: January 21, 2024 09:15 PM2024-01-21T21:15:00+5:302024-01-21T21:15:15+5:30

बुधवारी चालक दिन : असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगने (एएसआरटीयू) २४ जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देशातील सर्व परिवहन उपक्रमांना दिले आहेत.

Maharashtra State Road Transport Corporation will celebrate Driver's Day on Wednesday | आगार सजणार, चालकांचा गौरव होणार; सुरक्षित वाहतूक, डिझेल बचतीचा सन्मान

आगार सजणार, चालकांचा गौरव होणार; सुरक्षित वाहतूक, डिझेल बचतीचा सन्मान

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बुधवारी (२४ जानेवारी) चालक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी विना अपघात सेवा देणाऱ्या, डिझेलची बचत करणाऱ्या चालकांना सन्मानित केले जाणार आहे. यानिमित्त चालकांच्या अभिनंदनाचे फलकही झळकणार आहे. रांगोळी टाकून, स्वच्छता करून आगार सजविले जाणार आहे.

असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगने (एएसआरटीयू) २४ जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देशातील सर्व परिवहन उपक्रमांना दिले आहेत. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातील सर्व आगारामध्ये सत्कार सोहळा घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात विनाअपघात सेवा देणाऱ्या प्रथम पाच चालकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या १५ हजार बसपैकी बहुतांश बसची स्थिती अतिशय खराब झालेली आहे. या परिस्थितीत कमी डिझेलमध्ये अधिक किलोमीटर एसटी बस चालविण्याचे आव्हान चालकांपुढे आहे. कसब वापरून अधिक किलोमीटर चालविणाऱ्या (केपीटीएल) प्रथम पाच चालकांनाही यावेळी गौरविले जाणार आहे. महामंडळाला १० लिटर डिझेलमागे ५० किलोमीटर प्रवास अपेक्षित आहे. हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रथम पाच चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय महामंडळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचेही कौतुक होणार आहे.

आगाराचे पालक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन चालकांना सन्मानित केले जाणार आहे. सुरक्षित प्रवास आणि डिझेल बचतीकरिता चालकांना प्रेरणा मिळावी, म्हणून हा सोहळा घेण्यात येणार आहे. आव्हानांना समर्थपणे तोंड देत आतापर्यंत एसटीला सातत्याने प्रगतिपथावर ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या चालकांनी आताही आपल्या नावलौकिकास जपले पाहिजे, असे महामंडळाचे अपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी आवाहन पत्रात प्रामुख्याने नमूद केले आहे.

काटकसरीचा सोहळा

चालकांच्या छोटेखानी सत्कार सोहळ्यासाठी महामंडळाने प्रति आगार ५०० रुपये मंजूर केले आहे. या रकमेतून दहा चालकांसाठी पुष्पगुच्छ, सहा बाय दोन आकाराचे अभिनंदन बॅनर, सुशोभीकरण, रांगोळी आणि इतर खर्च करायचा आहे. एकंदरच हा काटकसरीचा कार्यक्रम असणार आहे.

Web Title: Maharashtra State Road Transport Corporation will celebrate Driver's Day on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.