Maharashtra Election 2019: Chief Minister Fadnavis takes work for benefits Gujarat; Criticism of Sharad Pawar | Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा; शरद पवारांची टीका
Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री फडणवीसांचा कारभार गुजरात धार्जिणा; शरद पवारांची टीका

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य अधोगतीला चालले आहे. राज्यावर आघाडी सरकारच्या काळात असलेले कर्ज युती सरकारमध्ये दुप्पट केले गेले. महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात धार्जिण्या धोरणांना स्वीकारत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतून आलेले निर्देश येथील मुख्यमंत्री कोणताही विचार न करता राबवितात. यामुळेच येथील विकास दर खाली घसरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रपरिषदेत केला. यवतमाळ दौऱ्यावर असताना गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीचे आव्हान देताना आमच्या समोर कुणी पहेलवान दिसत नाही असे म्हणतात. मात्र त्यांनी या मुद्यावर बोलण्याऐवजी पाच वर्षाच्या सत्तेत किती नवीन उद्योग आणले, किती बंद पडले, किती रोजगार निर्माण झाले, किती कामगार बेरोजगार झाले, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे स्पष्ट करावे. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही. येथील स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना बगल देऊन ३७० कलम रद्द केल्याचे सांगतात. हे समाजाच्या व राज्याच्या हिताचे नाही.  

बुलेट ट्रेन गुजरातच्या सोईसाठी
राज्यावर कर्जाचा डोंगर असताना गुजरातच्या सोईसाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला. यात हजारो कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले. या ट्रेन ऐवजी दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा रेल्वे मार्ग घेतला असता तर विदर्भ, मराठवाड्याला  फायदा झाला असता मात्र केंद्रातून गुजरात सरकारच्या सोईचे निर्णय घेण्यास निर्देश दिले जाते. त्याची अंमलबजावणी राज्याचे मुख्यमंत्री करतात. विदर्भाला पूर्ण सत्तेतील मुख्यमंत्री मिळाला, मात्र पाच वर्षात येथे कोणताच विकास झाला नाही. येथील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यावरून इतर महाराष्ट्रात काय स्थिती असेल हे लक्षात येते. राज्यातील नाशिक, खान्देश या गुजरात सीमेजवळच्या भागात दरवर्षी अतिवृष्टी होते. येथील पाणी गुजरातकडे वाहून जाते. हे पाणी महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा व इतर भागात वळते केल्यास सिंचनाची क्षमता वाढविणे शक्य आहे. मात्र यावर मुख्यमंत्री काम करणार नाही. 

कापसाला सात हजार भाव मागणारे सत्तेत 
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना विविध आंदोलनांच्या माध्यमातून अनेक मागण्या करीत होते. सोयाबीन व कापूस यासाठी सात हजाराचा भाव त्यांनी मागितला. जनतेने विश्वासाने सत्ता त्यांच्या हातात सोपविली. मात्र त्यांनी ज्या मुद्यांवर आंदोलने केली, त्याची पूर्तता स्वत: सत्तेत राहून केली नाही. उलट महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातकडे कशी वळविता येईल यासाठी प्रयत्न होत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

एकही नवा उद्योग आला नाही 
गेल्या पाच वर्षात यवतमाळ शहरात कोणत्या उद्योगाची भर पडली हे सत्ताधाऱ्यांनी सांगावे, उलट येथील सुरू असलेले उद्योग डबघाईस आले आहेत. अशीच स्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. नाशिकमध्ये १५ हजार कामगार बेरोजगार झाले. एका एमआयडीसीची स्थिती अशी असेल तर देशपातळीवर विचारही करता येणार नाही. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. २० हजार कामगार बेरोजगार झाले. आता बीपीएल ही ऑईल कंपनी सरकारने विकायला काढली आहे. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाºयांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे डबघाईस आल्या. आता त्यांनी या कंपन्या विकायला काढल्या आहे. 

तरुणांना आता परिवर्तन हवे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून येणाऱ्या सूचनांचे डोळेझाकपणे पालन व विरोधकांना शिव्याशाप देण्याचे काम पाच वर्ष केले. त्यामुळे आता युवा तरुणाला परिवर्तन हवे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा व विविध सभा यातून परिवर्तनाचे वातावरण दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, माजी सभापती सुभाष ठोकळ आदी उपस्थित होते. 

विदर्भात नितीन गडकरींनी आणला निधी
विदर्भात जे काही रस्ते आज तयार झाले आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणले आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेच ठोस काम केले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला. 

लिंबू, मिरचीवर विश्वास नाही
राफेल विमानाची देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी लिंबू ठेऊन पूजाअर्चा केली. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, लिंबू, मिरचीवर माझा विश्वास नाही. लिंबू, मिरची टांगून पूजा करणाऱ्यांना धन्यच मानायला हवे या शब्दात त्यांनी माजी संरक्षणमंत्री म्हणून प्रतिक्रिया दिली.

Web Title: Maharashtra Election 2019: Chief Minister Fadnavis takes work for benefits Gujarat; Criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.