लोहारा बायपास परिसर जलमय

By Admin | Updated: September 1, 2014 23:56 IST2014-09-01T23:56:35+5:302014-09-01T23:56:35+5:30

वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ

Lohara Bypass Complex Waterfalls | लोहारा बायपास परिसर जलमय

लोहारा बायपास परिसर जलमय

यवतमाळ : वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ मार्ग काढणे कठीण झाले आहे. शिवाय या परिसरात विजेचाही लपंडाव सुरू आहे.
लोहारा-वाघापूर मार्गावर असलेले मैथिलीनगर, राऊतनगर, अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधलेल्या नाही. पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहत जाते. गेली दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. अनेक घरे पाण्याखाली आली आहे. संपूर्ण घराला विळखा पडला आहे.
या भागामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण झाले, काही ठिकाणी खडीकरणही करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रमुख रस्त्यावरील खोलगट भागातून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते. त्यात सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. यापासून धोका निर्माण झाला आहे. घरासमोरील रस्त्यावरून वाहणारे पाणी कित्येक दिवसपर्यंत थांबत नाही. ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी मुरूम टाकलेले रस्तेही आता चिखलमय झालेले आहे. आता त्यातून मार्ग काढण्याचा प्रश्न या भागातील हजारो नागरिकांपुढे आहे.
काही दिवसांपूर्वी अहल्यानगरीत सिमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी मुख्य नाल्याला जोडण्यापर्यंत काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील नव्यानेच तयार झालेल्या डांबरी रस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नागरिकांच्या घरापर्यंत दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. नालीचे बांधकाम करताना पाईप टाकण्यात आलेले नाहीत. शिवाय कामही अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या अंगणात शिरत आहे.
मैथिलीनगरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी मुख्य नाल्यापर्यंत काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने गेली अनेक वर्षांपासून दाखविलेले नाही. या भागातील सर्व पाणी अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागात शिरत आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहात असल्याने मार्ग काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
या भागात गेली काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तास-अर्धा तासाने वीज पुरवठा खंडित होत आहे. या मागील नेमके कारण शोधण्याचे सौजन्य विद्युत कंपनीकडून दाखविले जात नाही. या भागात असलेल्या रोहित्रांच्या पेट्यांची दारेही बेपत्ता आहेत. त्यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दिवसाही पथदिवे सुरू राहण्याचा आजार या भागाला जडला आहे. दुसरीकडे अनेक खांबांवरील दिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. वारंवार सांगितल्यानंतरही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते.
सदर भाग लोहारा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.५ मध्ये येतो. या ग्रामपंचायतीच्या सरपंचही याच प्रभागातून निवडून आलेल्या आहेत. शिवाय दोन सदस्यही आहे. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Lohara Bypass Complex Waterfalls