यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 94 हजार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:47 IST2017-12-12T20:45:42+5:302017-12-12T20:47:08+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 1 लक्ष 94 हजार 97 शेतक-यांना लाभ मिळाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 94 हजार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ
यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 1 लक्ष 94 हजार 97 शेतक-यांना लाभ मिळाला आहे. यात 1 लक्ष 33 हजार 871 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 35 हजार 282 शेतक-यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील 24 हजार 944 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लक्ष शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 77 लक्ष अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून 69 लक्ष खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी जवळपास 41 लक्ष खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतक-यांनाही या योजनेत सामावून घेणार असून शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवली जाईल.
योजनेच्या पारदर्शक कार्यवाहीसाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे राज्यभरातील शेतक-यांचा मोठा डाटाबेस शासनाकडे जमा झाला आहे. याचा उपयोग शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका बजावणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 20 राष्ट्रीयकृत बँकेच्या 171 शाखा आहेत. यापैकी जवळपास 161 शाखांमार्फत कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण जिल्ह्यात एकूण 94 शाखा असून यापैकी 78 शाखांमार्फत रक्कम जमा करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे शासनाचे धोरण आहे. तसेच कर्जमाफीसाठी टप्प्याटप्प्याने ग्रीन लिस्ट व कर्जमाफीची रक्कम प्राप्त होत असून त्यानुसार शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे.
यावेळी प्रतिक्रिया देतांना दिग्रस तालुक्यातील वाईमेंढी येथील राजेश इश्वरराव डवले म्हणाले, माज्यावर 40 हजार 300 रुपयांचे कर्ज होते. दोन-तीन वर्षांपासून पीक झाले नाही. माझे कर्ज माफ होण्यासाठी मी आॅनलाईन अर्ज भरला होता. माझे कर्ज माफ झाल्यामुळे मी शासनाचा आभारी आहे. पुढील वर्षी मला नव्याने कर्ज मिळणार असा आता मला विश्वास आहे. यावेळी सावंगा (खुर्द) येथील गजानन दशरथ खरबडे म्हणाले, माज्याकडे पाच एकर शेती आहे. सतत नपिकी होत होती. तरीसुध्दा मी बँकेचे कर्ज भरण्यासाठी उसनवारी पैसे घेऊन कजार्ची रक्कम भरत होतो. कजार्ची रक्कम नियमित भरत असल्यामुळे शासनाच्यावतीने माज्या खात्यात 15 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून जमा झाले आहे. याचे मला समाधान आहे. यवतमाळ तालुक्यातील चिंचबिडी येथील नामदेव बिंदाजी सोयाम म्हणाले, माज्यावर 33 हजार 617 कर्ज होते. शासनाने माझे कर्ज माफ केले, यासाठी मी शासनाचे आभार मानतो.