या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी भातीयय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता कसोटीनंतर भारताचा एकदिवसीय संघसुद्धा शुभमन गिलच्या नेतृत्नाखाली खेळताना दिसणार आहे. मात्र भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आता रोहित शर्मा याने भारतीय संहाचं नेतृत्व स्वत: सोडलं की त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं, याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. तसेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषित करण्यात आलेल्या भारताच्या एकदिवसीय संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. ते फलंदाज म्हणून संघातून खेळतील. मात्र या दौऱ्यासाठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड न करण्यात आल्याने त्याच्या कारकिर्दीबाबत बीसीसीआयने त्याला स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.
सध्या तरी रोहित शर्मा याने कर्णधारपद सोडले आहे की, त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे हे सध्यातरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केलेल्या विधानामुळे रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे, अशीच शक्यता अधिक दिसत आहे. निवड समिती क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याच्या बाजूने नव्हती, असे अजित आगरकर यांनी भारतीय संघ जाहीर करताना सांगितले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी तीन वेगवेगळे कर्णधार निवडणे हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. एकदिवसीय क्रिकेट हा सध्या खूप कमी प्रमाणावर खेळला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे सध्यातरी आमचं लक्ष हे टी-२० विश्वचषकावर आहे. तसेच शुभमन गिलला सावरण्यासाठी काही अवधी मिळाला पाहिजे, असे आमचे मत आहे.
यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत अजित आगरकर म्हणाले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी यांनी भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. आम्ही नेहमी निवड झालेल्या खेळाडूंची नावं सेंटर ऑफ एक्सिलेंसला पाठवतो. तसेच तिथून त्यांच्या तंदुरुस्तीची चाचपणी करतो.