४० वर्षानंतरही सिंचनाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST2018-08-01T00:13:19+5:302018-08-01T00:14:49+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन होते.

४० वर्षानंतरही सिंचनाचा खोळंबा
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन होते. प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेइतके पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. यासाठी जलभूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (वाल्मी) यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून ११८ कोटी रुपयांचा आराखडा दिला आहे.
६५ किलोमीटरच्या आणि ५० किलोमीटर अशा दोन कालव्यातून शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी नवीन आराखड्यानुसार ११८ कोटी खर्च अपेक्षित आहे. शासन हा निधी उपलब्ध करून देणार का यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
कालव्यातून ५० किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले असले तरी कालवे नादुरुस्त झाल्यामुळे व्यवस्थित सिंचन होऊ शकत नाही. आणि पुढील भागात मात्र पाण्याचा थेंबही गेला नाही. त्यामुळे या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पाच्या कालव्याच्या लांबीत असणारे जलसेतू ,ग्रामीण मार्ग पूल, हसूम ,मालिका मोरी, क्रॉस रेगुलेटर, सायफन, अशी विविध प्रकारची एकूण १८७ बांधकामे असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कालव्याचे अस्तरीकरण करणे सुद्धा आवश्यक आहे. टेलपर्यंत पाणी पोहोचण्याकरीता यामागची तांत्रिक कारणे शोधणे गरजेचे आहे. हीच बाब हेरून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याकरिता वाल्मी मार्फत या प्रकल्पाचा अभ्यास व्हावा यासाठी पुढाकार घेतला. डिसेंबर २०१५ मध्ये वाल्मीने प्रकल्पाची पाहणी केली. सूक्ष्म अभ्यासाअंती काही दिवसांपूर्वी त्यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती करीता शंभर कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कालव्याच्या दुरुस्ती करीता पुरेसा निधी मिळावा याकरिता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी प्रयत्न सुरू केले आहे. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक सुद्धा पार पडली. बैठकीत संजय राठोड यांनी वाल्मी च्या शिफारसीनुसार कालवे दुरुस्तीचे कामाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.
लाभ क्षेत्रातील गावे कोरडीच
या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या म्हसणी, रामगाव, बोदेगाव, मानकोपरा, चिखली, भांडेगाव, मानकी, कोलवाई, तेलगव्हाण, घाटकिन्ही, तळेगाव, पाळोदी, घाणापुर, शेंद्री, डोल्हारी, पेकर्डा, गणेशपुर, गौळपेंड, शेलोडी, बोरी, वघुळ, कीन्हीवळकी, बागवाडी सायखेडा, साजेगाव पिंप्री, दहेली, हरु व निंभा येथे अजूनही सिंचनाचा लाभ मिळत नाही.