जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणाली राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:12+5:30
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांसह सर्वच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी लावून धरली.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणाली राबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदशिक्षकांचे वेतन ऐन कोरोना काळात विलंबाने होत आहे. त्यामुळे वेतन अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा तातडीने अवलंब करावा, अशी आग्रही भूमिका शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी मांडली. त्यावर सभापतींनी येत्या चार दिवसात याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासनही दिले.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांसह सर्वच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी लावून धरली. या मागणीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले असून त्यावर लवकरच निर्णय होइल, असे सभापतींनी स्पष्ट केले. जालना, हिंगोली अशा ठिकाणी सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे पगार वेळेत होत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत मात्र शासनाचे अनुदान आल्यावरही वेतनाला विलंब का होतो, असा सवाल काठोळे यांनी उपस्थित केला. बीडीएस प्रणाली बंद केल्याने जीपीएफ मिळण्यात अडचणी आल्या, मेडिकल बिल मिळणे कठीण झाले, गेल्या तीन महिन्यांपासून पगारही झाले नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच चटोपाध्यायचे १७४ प्रस्ताव येत्या चार दिवसात सादर होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, प्रीतीताई काकडे, निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे, डाॅ. सतपाल सोवळे, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
रिक्त पदे भरा, बदल्या करा
शिक्षण विभागातील रिक्तपदांचा मुद्दा यावेळी डाॅ. सतपाल सोवळे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात १२८२ एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यात १९० मुख्याध्यापक, तर ४३४ विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा पदोन्नतीने भरणे शक्य आहे. रिक्त पदांचा अनुशेष कमी करण्यासाठी तत्काळ पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सोवळे यांनी लावून धरली. बदल्या रद्द करण्याबाबत अद्याप शासनाचा कुठलाही आदेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची यादी जाहीर करणे, सेवाज्येष्ठता यादी पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.