यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केंद्रांबाहेर कापसाची शेकडो वाहने रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:39 IST2020-05-15T13:39:12+5:302020-05-15T13:39:35+5:30
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली.

यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केंद्रांबाहेर कापसाची शेकडो वाहने रांगेत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. अडचणीचा काळ पाहून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करत आहे.
जिल्ह्यात जवळपास तीन लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी आहे. हा कापूस विकण्यासाठी अगदी मोजके दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे एकाचवेळी कापूस वाहनांची गर्दी होत आहे. यातही व्यापाऱ्यांनी पणनच्या काही केंद्रांवर संधान साधले असून शेतकऱ्यांकडून कमी भावात कापूस घेवून तो पणनला विकला जात आहे. यवतमाळ, बाभूळगाव, नेर या तालुक्यातील कापूस यवतमाळ एमआयडीसीत असलेल्या चार जिनिंग प्रेसिंगमध्ये खरेदी केला जात आहे. तेथे पणनच्या चार टीम आहे. एकाचवेळी १४५ वाहने येथे आली आहे.
खासगी बाजारात हजार रुपये कमी
शासनाने कापसाचा हमी दर पाच हजार ४०० रुपये जाहीर केला आहे. आता सध्या पणनकडून पाच हजार ३०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. गर्दी झाल्याने व अडचणीतील शेतकऱ्यांना हेरून हजार रुपये कमी दराने खासगी व्यापारी खरेदी करत आहे. क्विंटल मागे एक हजाराची तफावत शेतकऱ्यांना दिवाळखोरीत काढणारी आहे.