पुनवट येथील वन कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था

By Admin | Updated: May 15, 2014 02:24 IST2014-05-15T02:24:33+5:302014-05-15T02:24:33+5:30

पांढरकवडा वन विभागाअंतर्गत येणार्‍या कुर्ली-पुनवट वन क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था झाली आहे

Heavy drought in the forest dwellers' resident at Punt | पुनवट येथील वन कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था

पुनवट येथील वन कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था

जंगलातून चंदनाची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर
वन विभाग : कर्मचारी मुख्यालयी राहातच नसल्याने अवकळा


पुनवट : पांढरकवडा वन विभागाअंतर्गत येणार्‍या कुर्ली-पुनवट वन क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात न आल्याने आता ती मोडकळीस आली आहे.
साधारणत: गेल्या २0 वर्षांपूर्वी पुनवट येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाजूला वन कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान बांधण्यात आले. मात्र गेल्या २0 वर्षांपासून या निवासस्थानात कोणताही कर्मचारी राहायला आलाच नाही. वन कर्मचारी मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे ही निवासस्थाने बेरवास पडली आहेत. त्याची देखभालही केली जात नाही. परिणामी ही निवासस्थाने आता मोडकळीस आली आहेत.
या निवासस्थानांचे बांधकामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे वास्तूला आता ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. बेवारस असलेल्या या इमारतीचा आता ग्रामस्थांकडून गैरवापर होत आहे. काही ग्रामस्थ तर या इमारतीमध्ये आपली गुरे बांधतात व त्याचा वापर गोठय़ाप्रमाणे करतात. वन विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
वन कर्मचारी निवासस्थान असूनही त्यात राहात नसल्याने या परिसरातील जंगलातील सागवानासारख्या महत्वाच्या वृक्षांची कत्तल सुरू आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी मूग गिळून गप्प बसले आहेत. या अवैध जंगल तोडीकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करीत आहे. वन विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन जंगलाचे संरक्षण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. (वार्ताहर)
 ■ कुर्ली-पुनवट वन परिसर वन संपत्तीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या परिसरात दुर्मीळ झालेली चंदनाची झाडे आहेत. पूर्वी चंनाची भरपूर झाडे होती. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आता त्यांची संख्या नगण्य झाली आहे. परिसरात चंदनाचे झाड दिसणे आता कठीण झाले आहे. वन विभागातील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे या परिसरातील मौल्यवान वन संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Heavy drought in the forest dwellers' resident at Punt