आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

By Admin | Updated: May 15, 2014 01:37 IST2014-05-15T01:37:06+5:302014-05-15T01:37:06+5:30

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे

Health department's Tvasa runs here | आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

पांडुरंग भोयर ल्ल सोनखास

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे. अनेक रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक आणि गटविकास अधिकारी तिवसा येथे बुधवारी सकाळीच पोहोचले. अस्वच्छतेमुळे तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असला तरी अद्यापही ग्रामपंचायत स्वच्छतेबाबत उदासीनच दिसत असून आज गावात स्वच्छतेची कोणतीही मोहीम हाती घेण्यात आली नाही. तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला. जवळपास ५० कुटुंबामध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डायरियाची लागण होऊनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. रुग्ण आपल्या परीने शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळीच आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे दाखल झाली. डॉ.सुषमा खोडवे, डॉ. सरला सोनकर, डॉ.एम.पी. ढबाले, डॉ.ए.एम.जाधव, डॉ. पुष्पा येपुरे, डॉ.पी.बी. वानखेडे यांचे पथक तिवसा येथे दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे गटविकास अधिकारी घोंगडे आणि विस्तार अधिकारी सिकले तिवसा येथे पोहोचले.

आरोग्य विभागाच्या चमूने गावातील प्रत्येकाचे रक्तनमुने घेतले असून रुग्णांना सलाईन लावून औषधोपचारही केले आहे. दिवसभर आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे तळ ठोकून होती. दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात १५ तर खासगी रुग्णालयात तीन रुग्ण उपचार घेत आहे. तिवसा येथे डायरियाची लागण होण्यामागचे मुख्य कारण अस्वच्छता आहे. परंतु ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही. आरोग्य चमू गावात असतानाही ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम मात्र हाती घेतली नाही. आजही गावात घाणीचे साम्राज्य दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Health department's Tvasa runs here