बोगस बियाणे व खतांचा शिरकाव होण्याची भीती
By Admin | Updated: July 8, 2015 00:13 IST2015-07-08T00:13:22+5:302015-07-08T00:13:22+5:30
बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.

बोगस बियाणे व खतांचा शिरकाव होण्याची भीती
शेतकरी धास्तावले : नेर येथे दलालांमार्फत विकले जात आहे साहित्य
नेर : बोगस बियाणे आणि खतांचा तालुक्यात शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. दलालांमार्फत हे साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. शिवाय कुठे असा प्रकार आढळल्यास तत्काळ तक्रार करण्याचेही सुचविण्यात आले आहे.
तालुक्यात जवळपास ६० टक्के पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरणी आर्थिक टंचाई आणि पाऊस खोळंबल्याने थांबली आहे. याही स्थितीत बियाणे आणि खतांची खरेदी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. यासाठीच बोगस बियाणे आणि खते दाखल झाल्याची माहिती आहे.
अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापूर येथील बोगस खताच्या कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात बोगस बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री करताना काही लोकांना पकडण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभाग सतर्क झाला आहे. दररोज कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद बाबींची चाचपणी केली जात आहे. यानंतरही काही व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची वाढती मागणी असलेल्या बियाण्यांची जादा दराने विक्री करणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर यासाठी दलालांची नेमणूक केली जात आहे.
बोगस बियाणे तालुक्यात आढळले नसले तरी त्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही बियाणे विकण्याची शक्यता आहे. उधारित बियाणे देण्याची तयारीही काही लोकांकडून होण्याची शक्यता आहे. या प्रकाराला कुणीही बळी पडू नये, यासाठी कृषी विभागाने आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे.
तालुक्यात कपाशी आणि सोयाबीनची पेरणी अधिक क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खते खरेदी करताना अधिकृतता तपासून पाहावी, रितसर पावती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गावपातळीवर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठा करू नये आणि त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सुचविण्यात आले आहे. बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांबाबत अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला होता. (तालुका प्रतिनिधी)