The farmers hit the Ner police station | शेतकरी नेर पोलीस ठाण्यावर धडकले
शेतकरी नेर पोलीस ठाण्यावर धडकले

ठळक मुद्देकापूस चोऱ्या थांबवा । मोझर, रत्नापूर, लवतवाडी परिसरात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यात कापूस चोरट्यांनी हैदोस घातला आहे. रात्रीच्यावेळी शेतातील कापूस चोरून नेला जात आहे. शुक्रवारी रात्री दहा शेतातील कापूस वेचून नेत असताना चोरटे शेतकऱ्यांना आढळले. पाठलाग केल्याने वेचलेला कापूस टाकून चोरटे पसार झाले. दरम्यान, या कापूस चोरांचा बंदोबस्त करावा, ही मागणी घेऊन शेतकरी शनिवारी येथील पोलीस ठाण्यावर धडकले.
मोझर, रत्नापूर, लवतवाडी शिवारातील शेतात कापूस चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. काही शेतकºयांना हा प्रकार आढळून आला. अशोक मस्के, शोभा मस्के, रवींद्र राठोड, परमानंद राठोड, मुकिंदा राठोड, किशोर भेंडे, प्रभाकर शंभरकर, भीमराव उरकुडे, दिनेश बडगे, सचिन ठाकरे, अनिल काळे, गणेश कावरे आदी शेतातून कापूस चोरला होता. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी पाठलाग केल्याने जवळपास दोन क्विंटल कापूस टाकून चोरटे पळाले. मोझर येथील पवन तलमले यांच्या शेतातील स्प्रिंकलर संचही चोरी गेला.
मुकुंद राठोड हे शेतात जागल करत होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ जण त्यांच्या शेतात शिरले. मुकुंद राठोड यांनी शेजारील शेतात असलेले अक्षय उरकुडे, देवानंद राठोड, टिकम चव्हाण यांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचवेळी चोरटे पळाले. शनिवारी शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून चोरट्यांवर कारवाई करावी आणि कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरसेवक संदीप गायकवाड, निखिल भेंडे, प्रशांत जाधव, राहुल इंगोले यांनी शेतकऱ्यांची बाजू पोलीस ठाण्यात मांडली. विविध कारणांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. अशातच चोरट्यांकडून त्रास होत आहे. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The farmers hit the Ner police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.