भारनियमनावर शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:30 IST2018-11-06T22:29:24+5:302018-11-06T22:30:34+5:30
वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली.

भारनियमनावर शेतकरी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली.
दारव्हा तालुक्यातील चिकणी, मोझर, आमसेत, उमरठा, दिघोरी, वरूड ईजारा या गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीज कार्यालयावर धडक दिली. वारंवार वीज ट्रिप होत असल्याने ओलित थांबल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता चितळे यांना दिली. मात्र चितळे यांनी शेतकऱ्यांनाच धारेवर धरले. आपण बिल आणले आहेत का, आपण दर महिन्याला बिल भरता काय, असे प्रश्न विचारले. लाईन ट्रिप होण्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन न देताच शेतकऱ्यांना परत पाठविले.
यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही कोटेशन भरूनच वीज घेतली आहे. आम्ही आकोडे टाकत नाही. बिलाचा भरणाही केली जातो. तरीही कृषीपंपांना वीज मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, राजकुमार मुंदे, नानाभाऊ ढोंगे, प्रवीण मुंदे, कसनदास राठोड, तुकाराम बठे, देवा राठोड, ज्ञानेश्वर राठोड आदी उपस्थित होते.