निधीअभावी ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले

By Admin | Updated: September 6, 2014 02:24 IST2014-09-06T02:24:07+5:302014-09-06T02:24:07+5:30

दहेगाव-कुंभा साजा क्रमांक सातमध्ये बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे धोकादायक बनले आहे़ ....

Due to lack of funds the construction of the cross bridge was stopped | निधीअभावी ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले

निधीअभावी ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले

अण्णाभाऊ कचाटे मारेगाव
दहेगाव-कुंभा साजा क्रमांक सातमध्ये बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे धोकादायक बनले आहे़ दिशादर्शक फलकही नाममात्र ठरले असताना बेंबळा प्रकल्प कालवे विभागाच्या अभियंत्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे़
कुंभा गावाच्या पश्चिमेला गावाजवळून बेंबळाचा मुख्य कालवा गेला आहे. त्यामुळे प्रमुख जिल्हा मार्गावरील दहेगाव-कुंभा रस्ता बाधीत झाला आहे. दहा वर्षांपूर्वीच या कालव्यावर ओलांडणी पुलाचे नियोजन होते़ त्यासाठी बेंबळा प्रकल्प कार्यालयाने ओलांडणी पुलाच्या बांधकामासाठी ५० लाख ४८ हजारांचा अग्रीम निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला होता. तथापि सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगावच्या तत्कालीन उपअभियंत्याच्या दुर्लक्षितपणाने या पुलाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही़
दरम्यान आता या पुलाच्या बांधकामाची किंमत वाढली आहे. आता तेथे ओलांडणी पुलाऐवजी फूट ब्रीज, वळण रस्ता आदी पर्याय शोधले जात आहे. मात्र ग्रामस्थांनी ओलांडणी पुलाचीच मागणी रेटून धरली. त्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारी २०१३ मध्ये उपलब्ध निधी बेंबळा प्रकल्प कार्यालयाला परत केला होता. त्यानंतर बेंबळा प्रकल्प कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांना नव्याने पूल बांधकामाचा सुधारित प्रस्ताव मागितला़ सार्वजनिक बांधकाम विभागाने ११० लक्ष रूपयांचा वाढीव प्रस्ताव सादर केला़ बेंबळा कार्यालयाने सदर प्रस्ताव निधी मागणीसाठी नागपूर मंडळास पाठविला. मात्र अद्यापही निधी उपलब्ध न झाल्याने या पुलाचे बांधकाम होऊ शकले नाही़ या पुलाची आवश्यकता लक्षात घेता मंडळाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़

Web Title: Due to lack of funds the construction of the cross bridge was stopped