पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By Admin | Updated: May 14, 2014 00:01 IST2014-05-14T00:01:03+5:302014-05-14T00:01:03+5:30

भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Due to drying of the percolation pond, the fear of water scarcity will be severe | पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

नेर : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाणी समस्या निवारणासाठी तालुका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न होत असले तरी बर्‍याचशा ठिकाणी आडातच नाही तर पोहर्‍यात कुठूनअसा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे.

सूर्य आग ओकू लागल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच जनावरांसाठी वैरण हा प्रश्नही पशुधनपालकांना सतावत आहे. ते आपली धष्टपुष्ट जनावरे विकायला काढत आहेत. नदीनाल्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होत नाही. वैरण आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा याची चिंता शेतकर्‍यांना आहे.

वाटसरूंची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी गावागावात प्रमुख ठिकाणी पाणपोई लावली जात होती. विविध सामाजिक संस्था आणि संघटना यासाठी पुढाकार घेत होत्या. मात्र यात कमालीची घट झाली आहे. पाणीटंचाई हे प्रमुख कारण यासाठी कारणीभूत मानले जाते. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. अनेक कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.

पाणी पिण्यासाठी नागरिकांना हॉटेल किंवा चहाटपरीची वाट धरावी लागते. त्याठिकाणीही काही वस्तू घेतल्याशिवाय पाणी दिले जात नाही. व्यावसायिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकीकडे हा गंभीर प्रश्न असताना दुसरीकडे वटफळी येथे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याठिकाणची पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाय केले जात नाही. तालुक्यात निर्माण झालेल्या या प्रश्नाविषयी स्थानिकसह तालुक्याचे लोकप्रतिनिधीही गंभीर नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to drying of the percolation pond, the fear of water scarcity will be severe