Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:41 IST2025-08-26T17:33:55+5:302025-08-26T17:41:30+5:30
ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचं निश्चित झालं आणि रात्रीच कार्यालय फोडण्यात आलं.

Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज लंपास करून जाळल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. विशेष म्हणजे सोमवारी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने भ्रष्टाचार दडपण्यासाठी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सायखेडा ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी केल्या होत्या.
परंतु, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सोमवारी सकाळी ११:३० वाजता ग्रामसभा तसेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेत पितळ उघडे पडू नये म्हणून...
या आमसभेमध्ये ग्रामपंचायतीत झालेल्या विविध योजनेतील भ्रष्टाचाराबाबत गावकरी जाब विचारतील आणि भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून आम ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच रात्री ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप फोडून तसेच आतील कपाट फोडून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे लंपास करून ते बाहेर जाळण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी चौकशी करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पांढरकवडा गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना तक्रार पाठविण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर संजय पवार, अशोक कनाके, विनोद मडावी, ऋत्विक पवार, अरविंद निमकर, संदेश मेश्राम, प्रीतम अनाके, निखिल धुर्वे यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
श्वान पथक दाखल
सोमवारी सकाळी ११:३० वाजता ग्रामसभा असल्याने कार्यालयात पोहोचलो असता, कुलूप तुटलेले दिसले. कार्यालयाच्या मागे कागदपत्रे जाळल्याचे दिसून आले, अशी माहिती सायखेडा ग्रामपंचायतीचे प्रशासन किशोर चिंतावार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. दरम्यान श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.