भीमा कोरेगाव घटनेचे जिल्हाभर पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:58 IST2018-01-02T21:57:34+5:302018-01-02T21:58:14+5:30
भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. यवतमाळ शहरानजीक मोहा येथे बसवर आणि पुसद येथे दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

भीमा कोरेगाव घटनेचे जिल्हाभर पडसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. यवतमाळ शहरानजीक मोहा येथे बसवर आणि पुसद येथे दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तर पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे रस्ता रोको आणि आर्णी व बोरीअरब येथे बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी भीमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
यवतमाळ शहरानजीक मोहा फाट्यावर यवतमाळ-धामणगाव एसटी बसवर (क्र.एम.एच.१४-बीटी-४९८२) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. यात बसचे काच फुटले. या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे सकाळी ११ वाजता रस्ता रोको करण्यात आला. नागरिकांनी पुसद-हिंगोली मार्गावर दगड टाकून आणि टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पुसद शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौका दरम्यान दुपारी १२ वाजता काही व्यक्तींनी दुकांनावर दगडफेक केली. शहर पोलिसांनी काही वेळातच तेथे पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद येथे रॅली काढण्यात आली. उपविभागिय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
आर्णी आणि बोरीअरब येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. आर्णी येथील बाजारपेठ बंद होती. घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले. बोरीअरब येथील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. तर दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.