CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:07 IST2020-05-02T05:07:04+5:302020-05-02T05:07:14+5:30
महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे.

CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण
यवतमाळ : लॉकडाउन कालावधीत शासन गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत असताना राज्यातील २२ हजार बिनपगारी शिक्षक मात्र हक्काचा घास मिळविण्यासाठी कुटुंबासह उपोषण करीत आहेत. महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे.
गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या उपोषणात सहभागी झाले आहेत. वेतन अनुदान तातडीने वितरित करावे, अशी या शिक्षकांची मागणी आहे. तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित झालेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. अखेर महाराष्ट्रदिनी शिक्षकांनी स्वत:च्या घरातच शासनाच्या निषेधाचे, मागण्यांचे फलक लावून सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हजारो शिक्षकांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पाठोपाठ हजारो ईमेल आणि उपोषणाची छायाचित्रे रवाना केलीत. त्यामुळे गायकवाड यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिका-यांची व्हीसी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.