'तीन तलाक' प्रकरणी पोलिसावरच गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 13:40 IST2021-10-10T13:20:46+5:302021-10-10T13:40:25+5:30
Triple talaq : मुस्लीम महिला विवाह अधिनियमनाअंतर्गत एक पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पत्नीला कबूल केलेली रक्कम तर दिलीच नाही, उलट तीनवेळा तलाक म्हणून निघून गेल्याची तक्रार पीडित पत्नीने वणी पोलिसांत केली आहे.

'तीन तलाक' प्रकरणी पोलिसावरच गुन्हा दाखल
यवतमाळ : कबूल केलेली रक्कम तर दिलीच नाही, उलट पत्नीपुढे तीनवेळा तलाक (Triple talaq) म्हणून निघून जाण्याचा आरोप असलेल्या वणी पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान दिवाण खान असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव असून तो स्थानिक रवीनगरमधील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार इम्रान खान याचे घरगुती कारणावरून पत्नीशी नेहमीच खटके उडत होते. दरम्यान, इम्रान खानने पत्नीला सात लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यापैकी सुरुवातीला केवळ अडीच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम जून महिन्यात देतो, असे त्याने सांगितले होते.
परंतु जून महिना लोटूनही इम्रान खानने पत्नीला पैसे दिले नाही. त्यामुळे तिने इम्रान खानला आपण सोबत राहू, असा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याने मला तुझ्या सोबत राहायचेच नाही म्हणत हा प्रस्ताव धुडकावून लावला. सोबतच तिच्यापुढे तीनवेळा तलाक म्हणून तो तेथून रागारागात निघून गेला.
यासंदर्भात पीडित पत्नीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी वणी पोलिसांनी इम्रान दिवाण खानविरुद्ध भादंवि ४९८ अ, सहकलम ४ मुस्लीम महिला विवाह अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.