आर्णीत चणा खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:29+5:30

दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे.

Arni chickpea shopping jam | आर्णीत चणा खरेदी ठप्प

आर्णीत चणा खरेदी ठप्प

Next
ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : नाफेडकडून शेतकऱ्यांना खरेदीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यात यावर्षी साडेतीन हजार हेक्टरवर चण्याचे उत्पादन घेण्यात आले. मात्र नाफेडने चणा खरेदी सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.
दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे. नाफेडने हरभऱ्याला प्रतिक्विंटल चार हजार ८७५ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र खरेदी सुरू न केल्याने चणा उत्पादकांना खुल्या बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे.
खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल हजार ते १२०० रुपयांनी कमी मिळत आहे. त्यात यावर्षी लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बाजारपेठ बंद होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही इतर शेतमालाची शासनाने खरेदी सुरू केली.
चणा खरेदीसाठी मात्र कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्याच्या घरात हरभरा साठवून आहे. १५ जूननंतर चण्याची खरेदी सुरू होईल, असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी आर्थिक तजवीज करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

२१०० शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी
तालुक्यातील दोन हजार १०० शेतकऱ्यांनी चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. आजच्या घडीलासुद्धा नोंदणी सुरूच आहे. मात्र खरेदी नेमकी कधी सुरू होणार, याबाबत यंत्रणा काहीही सांगण्यास तयार नाही. परिणामी शेतकऱ्यांना पडेल भावाने चणा विक्री करावी लागणार आहे. आवक कमी झाल्यानंतर नाफेड खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे. यात शेतकरी वेठीस धरला जात आहे. चणा निघून दोन महिने झाल्यानंतरही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. या संकट काळात शासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून आहे.

Web Title: Arni chickpea shopping jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.