शनिवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
By Admin | Updated: April 25, 2015 23:57 IST2015-04-25T23:57:24+5:302015-04-25T23:57:24+5:30
हिवताप नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आठवड्यातील एक दिवस शनिवार कोरडा दिवस नागरिकांनी पाळावा,

शनिवार कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
यवतमाळ : हिवताप नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आठवड्यातील एक दिवस शनिवार कोरडा दिवस नागरिकांनी पाळावा, असे आवाहन येथे जिल्हा हिवताप विभागातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
थंडी वाजून ताप येणे, सतत ताप राहून घाम येणे, अंग गार पडणे, डोकेदुखी, मळमळ आणि बहुतांश वेळा उलटी होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत. या आजाराचे खात्रीशिर निदान रक्तनमूना, सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून घेऊन केले जाते.
सर्व शासकीय रुग्णालय आणि आशा कार्यकर्तीकडे रक्ताचा नमूना देऊन तपासणी करून निदान करता येऊ शकते अशी माहिती यावेळी देण्यात आली.
डासोत्पत्ती स्थानात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, नाल्या व गटारे वाहते करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, आरोग्य शिक्षण आदी उपाय योजनांतून डास नियंत्रण करता येऊ शकते अशी माहिती यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी एस.एम. तरोडेकर यांनी दिली.
(शहर वार्ताहर)
डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा तर डेंग्यूसदृश आजारामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली. या घटना मागील वर्षभरातील आहे. डास नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास हिवताप, डेंग्यू, चिकणगुण्या, चंडीपुरा आदी किटकजन्य आजारास आळा बसण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.