निश्चल गौर - डोंगरखर्डाशेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सहायक यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एका कृषी सहायकाकडे १० ते १२ गावे असल्याने कामांचा पार बोजवारा उडाला आहे. जोडमोहा मंडळात चार तर कळंब मंडळात एक कृषी सहायकाचे पद रिक्त आहे. डोंगरखर्डाला तर अनेक वर्षांपासून स्थायी कृषी सहायक मिळालेले नाही. जोडमोहा मंडळात ५० गावे आणि दोन उजाड गावे अशी ५२ गावे येतात. या मंडळात कृषी सहायकांच्या चार जागा रिक्त आहेत. डोंगरखर्डाला गेली पाच-सहा वर्षांपासून स्थायी स्वरूपात कृषी सहायक लाभले नाही. रिक्त जागा भरल्या गेल्या नसल्याने त्याचा परिणाम शेती नियोजनावर होत आहे. जलपूर्ती, मृदसंधारण, शतकोटी वृक्षलागवड, फळबागा, मग्रारोहयो, सांख्यिकी तक्ते, नैसर्गिक आपत्ती, अनुदान वाटप, विस्तार कार्यक्रम आदी कार्यक्रम आणि उपक्रम कृषी सहायकांकडून राबविले जातात. शिवाय शेती व्यवस्थापन, माती परिक्षण या कामांचीही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. एवढी सारी जबाबदारी असतानाही ते ‘तत्काळ’मुळे त्रस्त आहेत. कुठल्याही कामांचा अहवाल त्यांच्याकडून तातडीने मागविला जातो. कामाचा वाढता व्याप आणि वरिष्ठांकडून माहितीसाठी लावला जाणारा तगादा या कारणांमुळे ते त्रस्त आहे. एका कृषी सहायकाकडे दहा ते बारा गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोपविलेल्या प्रत्येक गावाला भेट देणे त्यांच्याकडून शक्य होत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांचे समाधान त्यांच्याकडून होत नाही. शासकीय योजनांची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे योग्य सर्वेक्षण होत नसल्याने तेही योग्य भरपाईला मुकतात. एकूणच कृषी सहायकाअभावी शेतीविषयक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जोडमोहा मंडळातील चार आणि कळंब मंडळातील कृषी सहायकाचे एक पद तत्काळ भरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एका कृषी सहायकाकडे १० गावांचा कारभार
By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST