मेडिकल फिटनेससाठी कोविड केंद्रावर परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:26+5:30

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढण्याकरिता सुरुवातीला एका व्यक्तीची मेडिकल फिटनेस ग्राह्य धरले जात होते. आता प्रवासासाठी निघणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस अपलोड केल्याशिवाय पास अप्रूव्ह केली जात नाही. धामणगाव मार्गावरील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी एका थर्मल गनच्या सहाय्याने फिटनेस तपासणी करत आहे.

Affordability at Kovid Center for Medical Fitness | मेडिकल फिटनेससाठी कोविड केंद्रावर परवड

मेडिकल फिटनेससाठी कोविड केंद्रावर परवड

googlenewsNext
ठळक मुद्देलांबच लांब रांग : तळपत्या उन्हात काढावे लागतात दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक कामासाठी जाण्याकरिता ई-पास काढणे गरजेचे आहे. ही ई-पास मिळविण्यासाठी प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करून हे प्रमाणपत्र जोडावे लागते. वैद्यकीय तपासणी केवळ धामणगाव मार्गावरील कोविड सेंटरमध्ये केली जाते. त्याठिकाणी बाहेरगाववरून आलेले व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढणारे या सर्वांची एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाते. त्यामुळे येथे लांबच लांब रांगा लागत असून कित्येक तास उन्हात काढावे लागत आहे.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढण्याकरिता सुरुवातीला एका व्यक्तीची मेडिकल फिटनेस ग्राह्य धरले जात होते. आता प्रवासासाठी निघणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस अपलोड केल्याशिवाय पास अप्रूव्ह केली जात नाही. धामणगाव मार्गावरील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी एका थर्मल गनच्या सहाय्याने फिटनेस तपासणी करत आहे. शरीराचे तापमान मोजून मेडिकली फिट-अनफिट सर्टिफिकेट दिले जात आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर तपासणीचा भार आहे.
गेल्या काही दिवसांपासून लग्न व इतर कार्यप्रसंगासाठी, उपचारासाठी, शैक्षणिक कामकाजासाठी, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ई-पासकरिता लागणारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोबतच बाहेरगावावरून परत आलेले नागरिकही वैद्यकीय तपासणीसाठी याच केंद्रावर येतात.
मंगळवारी धामणगाव मार्गावरील पॉलिटेक्नीक कॉलेजमधील केंद्रावर वैद्यकीय तपासणीसाठी लांबच लांब रांग लागली. त्याठिकाणी एकच डॉक्टर तपासणी करत असल्याने नागरिकांना तब्बल दोन तास तळपत्या उन्हात उभे राहावे लागत होते. कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस जोडावे लागत असल्याने लहान मुले, महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांची मोठी अडचण होत होती. तळपत्या उन्हात त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. या परिसरात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने अनेकांच्या घशाला कोरड पडली. गेल्या दोन दिवसांपासून या केंद्रावर मेडिकल फिटनेस मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येथे दोन ते तीन डॉक्टर थर्मल गनसह ठेवण्याची गरज आहे. अन्यथा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्याच्या रांगेतच एखादा कायमचा अनफिट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोविड केअर केंद्रावर एकच थर्मल गन असल्याने तपासणी करता-करता त्यातील सेल डिस्चार्ज झाले. वेळेवर सेलसाठी धावाधाव करावी लागली. त्यानंतर छापील असलेले मेडिकल सर्टिफिकेट संपले. त्यामुळे आणखीच तारांबळ उडाली. नागरिक रांगेत लागून थकल्याने परिसरात पूर्णपणे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला. बाहेरगावहून येणारे व यवतमाळातून बाहेरगावी जाणारे एकाच रांगेत लागत असल्याने येथे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे खासगी प्रॅक्टीशनर डॉक्टरकडूनही घेता येते. कोविड केंद्रावरच मेडिकल फिटनेस घेण्याची गरज नाही. गरिबांसाठी नि:शुल्क व्यवस्था केली आहे. नोंदणीकृत खासगी डॉक्टरांचे सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येते.
- ललितकुमार वऱ्हाडे,
निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Affordability at Kovid Center for Medical Fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.