विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:22 IST2025-07-22T06:21:46+5:302025-07-22T06:22:06+5:30
पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
आर्णी (जि. यवतमाळ) : पती व एका मुलाच्या अकस्मात निधनामुळे निराधार झालेल्या महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन सासरच्या मंडळींनी तिला मध्य प्रदेशात नणंदेकडे ठेवले. तेथून त्या महिलेची एक लाख २० हजारात गुजरात येथील एका व्यक्तीला विक्री करण्यात आली. त्या व्यक्तीने पीडित महिलेसोबत करार केला. तुझ्यापासून मला एक मूल हवयं, त्यानंतर तुला गावी सोडतो, असे सांगितले. तब्बल दोन वर्ष महिला गुजरातमध्ये राहिली. मुलगा झाल्यानंतर ती गावी परतली. हा धक्कादायक प्रकार आर्णी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेतून उघड झाला.
४२ वर्षीय महिला पती व मुलाच्या मृत्यूने विमनस्क झाली होती. तिचा एक मुलगा व एक मुलगी या दोघांना महिलेच्या नंणदेने मध्य प्रदेशात नेले. महिलेच्या माहेरची स्थिती बेताची असल्याने ती सासरीच राहत होती.
सासरच्या मंडळींनी रचला कट, बदल्यात घेतले पैसे
सासरच्या मंडळींनी या विधवा महिलेला विकण्याचा कट रचला होता. २०२३ मध्ये महिलेची नणंद व नंदई या दोघांनी त्या महिलेला सुरेश पोपटभाई चौसाने (४८) रा. हिरापूर ता. शंकर जि. मोरबी गुजरात याला विकले. त्या बदल्यात १ लाख २० हजार रुपये त्याच्याकडून घेतले. या व्यवहारानंतर पीडित महिला सुरेश पोपट याच्यासोबत दोन वर्ष राहिली. सुरेश पासून तिला एक मुलगा झाला. प्रसूतीनंतर सुरेशने काही दिवसापूर्वी त्या महिलेला आर्णी तालुक्यातील तिच्या माहेरी आणून सोडले.
दरम्यान आर्णी पोलिस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना त्यांना ही महिला गावीच असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
सासू सासरे यांच्याविरोधात गुन्हा
पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या माता-पित्यांनी दिली होती. मात्र ती २ वर्षांनी परतली.