ढाणकी नगर पंचायतसाठी ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:02+5:30
नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ सदस्य पदांसाठी ७४ असे एकूण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी ही निवडणूक लढविली. सर्वच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी ढाणकी येथे तळ ठोकून बसले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील नवनिर्मित ढाणकी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी तब्बल ७९.८३ टक्के मतदान झाले. मतदारांनी पहिलीच निवडणूक असल्यामुळे उत्साहाने मतदान केले.
नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ सदस्य पदांसाठी ७४ असे एकूण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी ही निवडणूक लढविली. सर्वच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी ढाणकी येथे तळ ठोकून बसले होते. रविवारी गावातील विविध पाच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच मतदारांनी उत्साह दाखविला. त्यामुळे सकाळी ११.३० पर्यंतच २७.४३ तर दुपारी १.३० वाजतापर्यंत ४५.२० टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ही टक्केवारी ६०.९३ वर पोहोचली. अखेरीस तब्बल ७९.८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगराध्यक्ष पदाचे सहा व सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या ७४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता यंत्रबंद झाले आहे. मतदारांनी आपला कौल दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सात पोलीस अधिकारी व ८० कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
आज मतमोजणी
मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता आहे. सोमवारी ढाणकी येथील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी अंतीच मतदारांनी नेमका कोणता उमेदवार व कोणत्या पक्षाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.