ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 06:48 IST2026-04-30T06:44:54+5:302026-04-30T06:48:05+5:30
ठेकेदाराने निष्काळजीपणे ही क्रेन भुसभुशीत भागावर लावल्याने ती कलंडून पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
मुंबई - मानखुर्द टी-जंक्शन पुढे वाशीच्या दिशेने, उड्डाणपूलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी रात्री एक्स्कॅव्हेटर ड्रिलिंग क्रेनला उलटून खाली पडली. त्यातील काही भाग अंगावर कोसळल्याने सायन-पनवेल मार्गावरून दुचाकीने पनवेल येथील घरी जात असलेल्या पोलिस हवालदार संतोष चव्हाण (४८) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध नोंदवला आहे.
गंभीर जखमी चव्हाण यांना स्थानिकांनी वाशीच्या एमजीएम रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सफार इन्फ्राटेक कंपनीचे मालक रेहान मोहम्मद अस्लम मलिक, इंजिनिअर रंजन कुमार शुक्ला, साईट सुपरवायझर शाहिर मुक्तार शेख, लिफ्टिंग अँड लॅशिंग सोल्युशन इंडिया कंपनीचे मालक मोहम्मद सउद हैदर अलि चौधरी, इंजिनिअर / सुपरवायझर सलमान इम्रान खान, पायलिंग मशिनचा ऑपरेटर सुदिप्ता (राजा) दयाल प्रमाणिक , हेल्पर रिजु श्रीधर बिस्वास यांच्यावर गुन्हा नोंदवला.
कशामुळे घडली दुर्घटना?
ठेकेदाराने निष्काळजीपणे ही क्रेन भुसभुशीत भागावर लावल्याने ती कलंडून पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी ठेकेदार, क्रेन चालक/ऑपरेटर, सहायक यांच्यासह संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेहरूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या चव्हाण यांनी पोलिस दलात एकूण २३ वर्षे सेवा केली. ते पूर्व प्रादेशिक नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. चव्हाण यांच्यावर सास्सोळे स्मशानभूमी, सेक्टर ४, नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली.
दुसऱ्या दिवशीही कोंडी
सायन–पनवेल मार्गावर क्रेन कोसळल्याने बुधवारीही या मार्गासह, मानखुर्द चेंबूर परिसरात प्रचंड मोठी वाहतूककोंडी झाली होती. दोन मोठ्या क्रेन आणून २९ एप्रिलच्या सायंकाळी ही अपघातग्रस्त क्रेन हटविण्यात आली. पण, वाहतूककोंडी कायम होती.
ताडदेवमध्ये क्रेनखाली चिरडून महिलेचा मृत्यू
ताडदेवच्या बेलासिस ब्रिजजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात सफाई कामगार संगीता कांबळे (५५) यांचा मृत्यू झाला. त्या ब्रिजजवळ झोपल्या असताना जेसीबी क्रेन चालकाने निष्काळजीपणे त्यांच्या दोन्ही पायांवरून क्रेन घातली. त्यांना नायर येथे नेले मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक कमलेश यादव (४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचा मुलगा चंद्रकांत कांबळे यांनी तक्रार दाखल केली.