विदर्भात आणखी आठ शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: July 8, 2015 00:14 IST2015-07-08T00:14:16+5:302015-07-08T00:14:16+5:30
जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

विदर्भात आणखी आठ शेतकरी आत्महत्या
‘विजस’ची माहिती : दुबार पेरणी व बँकांनीही नाकारले कर्ज, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विदेशवारीचा आरोप
यवतमाळ : जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यातच बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे विदर्भात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी कळविले आहे.
सहकारी बँकांना दोन हजार कोटी रुपयांची सरकारची हमी व पतपुरवठा आवश्यक असताना फक्त २५ कोटी रूपये दिल्याने विदर्भातील ४ लाखांवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटप न झाल्याने व जूनच्या पावसाने दडी दिल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या चिंतेपोटी मागील दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील चार तर अमरावती व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड येथील आदिवासी शेतकरी पांडुरंग मडावी, पांढरीचे मारोतराव एटरे, शिरसगावचे अमोल वहिले, टाकळी येथील महीला शेतकरी गुजाबाई मडावी तर अमरावती जिल्ह्ययातील शेन्दुर्जन्याचे संतोष चतुले व भिवापुरचे श्यामराव कोकार्डे आणि वर्धा जिल्ह्यातील पोरगव्हाणचे दिनेश भोंडे व गोहदाचे सतीश सिदराम यांचा समावेश आहे. यावर्षी विदर्भात ८०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे शेतकरी विक्रमी संख्येत आत्महत्या करीत आहेत तर सारे सरकार विदेशवारीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.
शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हवालदिल शेतकरी जीवनयात्रा संपवीत असल्याचा आरोप विदर्भ जनादोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
यावर्षी विदर्भाच्या ५० लाख कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमधून फक्त २० टक्के मागील वर्षीच्या २०१४-१५ थकीतदारांना पीककर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला असून मागील तीन वर्षापासून सतत नापिकी, दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे ४० लाख तणावग्रस्त शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत नवीन पीककर्ज मिळणार, अशी सरकारची घोषणा हवेत विरली असून आता मागील तीन वर्षापासून सतत नापिकी, दुष्काळ व अतिवृष्टीचा मार बसणारे थकीतदार ४० लाख तणावग्रस्त शेतकरी यांनी काय करावे यावर सरकारने बोलावे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीचा विचार चालू आहे असे सांगतात तर अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार सातबारा कोरा करता येत नाही कारण तिजोरी रिकामी आहे असा हवाला देतात. या सरकारने विदर्भाच्या कृषी संकटांचा व शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य गमावले असून सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती आली असल्याचेही ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करण्यात येत असून नाले खोदून व जमिनीत ओलावा आणल्याने महाराष्ट्राचे कृषी संकट संपणार ही सरकारची दिवाळखोरी असून यावर्षी बारमाही सिंचनाची सोय असणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, धानाला व तुरीला भाव न मिळाल्यामुळे झालेले नुकसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहावे असेही आवाहन केले आहे. ९० टक्के शेतकरी बँकेचे थकबाकीदार आहेत, लाखो शेतकऱ्यांकडे आर्थिक संकटामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, आजारांवर उपचार करण्यास दमडीही नाही. मायबाप सरकार मदतीला येईल, अशी भोळी आशा बाळगून असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)