सामाजिक दायित्वातून ५० गरोदर मातांना डोहाळ जेवण

By Admin | Updated: August 22, 2015 02:41 IST2015-08-22T02:41:02+5:302015-08-22T02:41:02+5:30

मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. या आनंदाच्या काळात गर्भवतीला डोहाळे लागतात.

50 pregnant mothers get a meal from social liability | सामाजिक दायित्वातून ५० गरोदर मातांना डोहाळ जेवण

सामाजिक दायित्वातून ५० गरोदर मातांना डोहाळ जेवण


उमरखेड : मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. या आनंदाच्या काळात गर्भवतीला डोहाळे लागतात. यासाठीच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र अनेक गर्भवतींना आर्थिक परिस्थितीमुळे डोहाळे जेवण मिळतच नाही. त्यांना याही काळात कष्ट उपसावे लागते. अशा मातांना डोहाळे जेवणाचा आनंद देण्याचा उपक्रम पोफाळी येथील एका अंगणवाडी सेविकेने राबविला. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० गरोदर मातांना डोहाळे जेवण दिले. या कार्यक्रमाची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून आता हा डोहाळे जेवण पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाणार आहे.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे पाच अंगणवाडी आहे. तेथील पर्यवेक्षिका प्रियंका राऊत यांनी डोहाळे जेवणाचा अभिनव उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार पाचही अंगणवाडी केंद्रातील सेविकांना सूचना देण्यात आली.
५० गरोदर मातांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले. दोन दिवसापूर्वी पोफाळी ग्रामपंचायत कार्यालयात या ५० माता एकत्र आल्या. त्यांना केळी, सफरचंद, मोतीचूर लाडू, चिकू, डाळींब, दुध, खजूर, चवळीची उसळ, मसाले भात, शेवग्याच्या पानाचे धापळे, पोळी असे भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण उपस्थित होत्या. यांच्यासोबतच पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, उमरखेडचे गटविकास अधिकारी अनिल अहीर, उपसभापती डॉ. विठ्ठलराव चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी आत्माराम बोंदरे, पोफाळीचे सरपंच नागोराव दोडके, पर्यवेक्षिका प्रियंका राऊत उपस्थित होत्या. जिल्ह्यात ५० गरोदर मातांना एकत्र आणून डोहाळे जेवण देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. कलशेट्टी यांनी कौतुक केले. तसेच हा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याची घोषणा सभापती विमल चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 50 pregnant mothers get a meal from social liability