लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या १,७९१ पदांची भरती बाह्य स्रोताद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वर्ग ३ व ४ मधील सुमारे २,४०० रोजंदारी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी ९ जुलैपासून विन्हाड आंदोलन सुरू करण्याचा आणि १० जुलै रोजी नाशिक आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
शासनाने २१ मे २०२५ रोजी बाह्यस्रोताद्वारे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील सर्वच आदिवासी विकास प्रकल्पातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. या विरोधात कर्मचाऱ्यांनी नाशिक आयुक्त कार्यालयावर पायदळ बिहाड मोर्चा काढला.
या आंदोलनादरम्यान १६ जून रोजी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच १७ जून रोजी मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले. त्यानंतर दोनवेळा कर्मचाऱ्यांनी मंत्री उईके यांची भेट घेतली. मात्र, १५ दिवसांचा कालावधी लोटूनही कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे राज्यातील रोजंदारी कर्मचारी आक्रमक झाले असून, बुधवारी बिहऱ्हाड आंदोलन सुरू करून नाशिक आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
"शासनाने मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास ज्या ठिकाणी आंदोलन स्थगित केले होते, तेथूनच बुधवारी पायदळ बिन्हाड मोर्चा आयुक्त कार्यालयावर काढण्यात येईल. आंदोलन स्थळापासून आयुक्त कार्यालय १५ किमी अंतरावर आहे. गुरुवार, १० जुलै रोजी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल. याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील."- ललित चौधरी, अध्यक्ष, रोजंदारी कर्मचारी संघटना.