पिस्तूल दाखवून १० लाखांचा दरोडा

By Admin | Updated: May 31, 2015 02:12 IST2015-05-31T02:12:28+5:302015-05-31T02:12:28+5:30

शुक्रवारी रात्री ८ वाजता येथील रामनगरात शासकीय कंत्राटदार जयंत वसंतराव चिद्दरवार यांच्या घरी दरोडा घालण्यात आला.

10 lakhs robbery by showing pistol | पिस्तूल दाखवून १० लाखांचा दरोडा

पिस्तूल दाखवून १० लाखांचा दरोडा

शासकीय कंत्राटदार : मारहाण करून घरात डांबले
पुसद : शुक्रवारी रात्री ८ वाजता येथील रामनगरात शासकीय कंत्राटदार जयंत वसंतराव चिद्दरवार यांच्या घरी दरोडा घालण्यात आला. पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर नऊ लाख रुपयांचा ऐवज लूटून नेण्यात आला.
दरोडेखोर संख्येने सहा व ३० ते ३५ वयोगटातील होते. घटनेच्या वेळी जयंत, त्यांची पत्नी, मोलकरीण आणि तिचा मुलगा हे चौघेच घरात होते. हॉलमध्ये टीव्ही पाहत असलेला मोलकरणीचा मुलगा रोहित शेवकर (१४) याला पिस्तुलचा धाक दाखवीत दरोडेखोरांनी जयंत यांच्या विषयी विचारणा केली. मुलगा त्यांना जयंत यांच्या खोलीकडे घेऊन गेला. तेथे जयंत यांच्यावर दोन दरोडेखोरांनी पिस्तुल रोखत त्यांच्या आणि पत्नी अर्चना (४५) यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यांना इतर दागिन्यांविषयी विचारणा करून ते ठेवलेले असलेल्या वरच्या माळ्यावरील खोलीत दरोडेखोरांनी चिद्दरवार दाम्पत्याला नेले. तिजोरीची चाबी घेऊन त्यातील दागिने आणि रोकड काढून घेतली. या प्रकाराने भेदरलेल्या मोलकरीण अर्चना शेवकर (४०) यांनी घराच्या मागील दाराने भाडेकरू सिंग यांचे घर गाठले. ताई सिंग यांनी ही माहिती भ्रमणध्वनीवर पतीला कळविली. याच वेळी चिद्दरवार यांच्या घरातील भ्रमणध्वनी खणखणल्याने ‘कुणी येणार आहे का’ अशी विचारणा दरोडखोरांनी केली. त्यावर भोजनासाठी आठ-दहा मित्र येत असल्याचे चिद्दरवार यांनी सांगताच दरोडेखोर दाराला बाहेरुन कडी लावून पसार झाले. त्यानंतर जयंत यांनी गॅलरीतून मदतीसाठी धावा केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार रमेश सोनुने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने उमरखेड रोडकडे माग दाखविला. जयंत चिद्दरवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भांदविच्या ३९५ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील प्रत्येकी दोघे पुसद व खंडाळ्याचे तर एक जण दराटीचा आहे. पोलिसांना अद्याप दरोडखोरांचा ‘क्ल्यू’ नसला तरी भाषेवरून ते मराठवाड्यातील नव्हे तर वैदर्भीय असावे, असा अंदाज ठाणेदार रमेश सोनुने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: 10 lakhs robbery by showing pistol