Next

शाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण

By शेखर पाटील | Published: July 25, 2018 02:59 PM2018-07-25T14:59:48+5:302018-07-25T15:01:28+5:30

शाओमीने सातत्याने किफायतशीर मूल्यातील मॉडेल्सवर भर दिला आहे.

शाओमी कंपनीने अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणार्‍या मी ए२ आणि मी ए२ लाईट या दोन स्मार्टफोन्सला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. शाओमीने सातत्याने किफायतशीर मूल्यातील मॉडेल्सवर भर दिला आहे. या अनुषंगाने मी ए२ आणि मी ए२ लाईट हे दोन्ही स्मार्टफोन्स मध्यम किंमतपट्टयातील आहेत. वर नमूद केल्यानुसार हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहेत. तथापि, याला लवकरच ओरियो या अद्ययावत आवृत्तीचे अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन वापरणार्‍या युजरला गुगल फोटोजवर अमर्याद स्टोअरेजदेखील मिळणार आहे.  मी ए२ हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज; ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा तीन पयार्यांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तर याची लाईट आवृत्ती ही ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हे दोन्ही मॉडेल्स ब्ल्यू, ब्लॅक आणि गोल्ड अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. या दोन्हींची डिझाईनसारखी असली तरी फिचर्समध्ये थोडा फरक आहे.शाओमीच्या मी ए२ या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर असेल. याच्या मागील बाजूस २० आणि १२ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,०१० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणार आहे.मी ए२ लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा व १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर दिलेला असेल. याच्याही मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १२ व ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असणार आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे. हे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार असल्याचे शाओमी कंपनीने जाहीर केले आहे.  

टॅग्स :शाओमीxiaomi