पाणीटंचाईच्या झळा तीव्र; मंगरुळपीरवासियांना ११ दिवसांतून एकदा पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:18 IST2018-01-19T17:15:33+5:302018-01-19T17:18:38+5:30
वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; मंगरुळपीरवासियांना ११ दिवसांतून एकदा पाणी
वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोतसावंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा उरल्याने भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने पाणी वापराबाबत नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मंगरुळपीर शहराला तालुक्यातील मोतसावंगा येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु यंदा अल्प पावसामुळे या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. मोतसावंगा धरणातून मंगरुळपीर शहरासह तालुक्यातील इतरही काही गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह अपव्यय टाळण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासह एकूण १५ प्रकल्पांत मिळून ९ टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यातच चांदई, कवठळ, सिंगडोह, मोहरी, सावरगाव, दस्तापूर आणि सार्सी बोथ या प्रकल्पांत शुन्य टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.