राजूरा परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:29 IST2019-04-09T17:29:40+5:302019-04-09T17:29:49+5:30
राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

राजूरा परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा!
- यशवंत हिवराळे
राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करून ग्रामस्थांना जाणवणारी समस्या दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कधीकाळी संपूर्ण मालेगाव शहराची तहान भागवून राजूरा परिसरातील कुरळा, सुकांडा, राजूरा, डव्हा, नागरतास येथील शेकडो हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविणाºया कुरळा तलावाची देखभाल-दुरुस्ती व योग्य नियोजनअभावी आजमितीस दुरवस्था झालेली आहे. या तलावातील पाण्याच्या भरोशावर सुकांडा, कुरळा, नागरतास आदी गावांमधील शेतकºयांकडून गव्हाचे विक्रमी उत्पन्न घेतले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन व तलावात दरवर्षी साचणाºया गाळामुळे तलावाची पाणीपातळी वर्षागणिक खालावत चालली आहे. यंदा देखील सद्या या तलावात जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
कुरळा तलाव हा जवळपास ५४ हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. या तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी फार जुनी आहे. अनेकदा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, जनतेच्या पदरी आश्वासनाखेरीज काहीच पडू शकले नसल्याचे वास्तव आजही कायम आहे.
राजूरा येथून जवळच असलेल्या खैरखेडा येथील जलस्वराज्य प्रकल्पाचा जलस्त्रोत देखील निकामी ठरला आहे. परिणामी, नदीपात्रातील ज्या पाण्यावर गुरे, ढोरे, कुत्रे पाणी पितात, महिला धुणे धुतात, त्याच झºयातील दुषीत पाण्यावर दरवर्षीच्या उन्हाळ्यात खैरखेडा येथील ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत असल्याची भयावह स्थिती आहे.
खैरखेडा हे मालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीसमस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु त्याचा विशेष फायदा झालेला नाही. तथापि, यावर्षी देखील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ती निकाली काढण्याकरिता टँकरव्दारा तत्काळ पाणीपुरवठा सुरू करणे गरजेचे ठरत आहे.
राजूरा येथून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या सुकांडा या गावातही दरवर्षीप्रमाणे यंदा एप्रिलच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या सुकांडा येथे काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प कार्यान्वित झाला. मात्र, या योजनेला पाणीपुरवठा करणारा जलस्त्रोतच ‘वांझोटा’ ठरल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्या ग्रामस्थांची तहान भागविणाºया गावातील सार्वजनिक पाच विहीरी, सहा हातपंपासह खासगी कुपनलिकांनी दम तोडला आहे. त्यामुळे प्रशासनाने गावात तत्काळ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.