पाणीटंचाईचे संकट टळले; रब्बीतील सिंचनाचा प्रश्न कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:50 PM2019-09-15T12:50:45+5:302019-09-15T12:50:55+5:30

जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

Water crisis avoided; Rabbi irrigation question remain in Washim | पाणीटंचाईचे संकट टळले; रब्बीतील सिंचनाचा प्रश्न कायमच!

पाणीटंचाईचे संकट टळले; रब्बीतील सिंचनाचा प्रश्न कायमच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णत: निवळला; मात्र वार्षिक पर्जन्यमानात ३० टक्के तूट अद्याप कायम असल्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न कायमच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.
जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून १३१ लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेले वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर हे अकराही बॅरेज सद्या तुडूंब भरले असून त्याचे दरवाजे अधूनमधून उघडण्यात येत आहेत. याशिवाय वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाची पातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्येही पिण्यासाठी आगामी एक वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. १३१ लघूप्रकल्पांपैकी काही प्रकल्प तुडूंब झाली असून बहुतांश प्रकल्पांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील विहिरी, कुपनलिका, तलाव या अन्य स्वरूपातील जलस्त्रोतांच्या पातळीतही बºयापैकी वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निवळली आहे.
असे असले तरी ७९८.७० मिलीमिटर या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १४ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ५६९.५९ मिलीमिटरच पाऊस कोसळला असून ३० टक्के तूट भरून निघण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्याचा परिणाम प्रामुख्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनावर होणार आहे.


सर्वात कमी पाऊस वाशिममध्ये
जिल्ह्यातील एकाही तालुक्याने यंदा आतापर्यंत पर्जन्यमानात वार्षिक सरासरी गाठलेली नाही. त्यातही वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस (६३.९८ टक्के) असून सर्वाधिक पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात (८०.८ टक्के) झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पर्जन्यमान ७१.३१ टक्के आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या पावसामुळे सर्व धरणांची पातळी सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी निकाली निघाला आहे; मात्र एवढ्या पाण्यावर आगामी रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार नाही.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा

 

Web Title: Water crisis avoided; Rabbi irrigation question remain in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.