जलसंधारणाच्या कामांत अवकाळी पावसाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:32 IST2018-11-20T17:31:43+5:302018-11-20T17:32:13+5:30
वाशिम: जिल्ह्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सुुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांत खोडा निर्माण केला आहे.

जलसंधारणाच्या कामांत अवकाळी पावसाचा खोडा
खोदकामांत साचले पाणी: प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा हिरमोड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सुुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांत खोडा निर्माण केला आहे. अर्धवट खोल समतल चर, नाला खोलीकरण आणि शेततळ्यांत पाणी साचल्याने या ठिकाणी मशीनने खोदकाम करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे किमान एक दोन दिवस कामे बंद ठेवावी लागणार आहेत. यामुळे या कामासाठी पुढाकार घेणारी भारतीय जैन संघटना, तसेच प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा थोडा हिरमोड झाला आहे.
राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, शेततळे, वनतळे, खोल समतल चरसह नदी खोलीकरणही करण्यात येत आहे. कृषी विभागासह पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत असून, कामांसाठी ग्रामपंचायतींचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात मानोरा, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव तालुक्यात ही कामे वेगाने करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रस्तावित केलेल्या कामांपैकी अनेक कामे पूर्णत्वास आली असताना सोमवार १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या कामांत खोळंबा निर्माण झाला आहे. जमा झालेले पाणी जमिनीत मुरणे किंवा बाष्पीभवनामुळे नष्ट होईपर्यंत ही कामे थांबवावी लागणार असल्याने प्रशासन आणि ग्रामपंचायतींसह बीजेएसचे पदाधिकारी आणि जलनायकांचा हिरमोड झाला आहे.