विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहतेय कूपनलिका
By दादाराव गायकवाड | Updated: September 18, 2022 17:41 IST2022-09-18T17:40:52+5:302022-09-18T17:41:47+5:30
वाशिम जिल्ह्यातील दमदार पावसाचा परिणाम

विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहतेय कूपनलिका
वाशिम: गेल्या काही दिवसांत वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १८ सप्टेंबरपर्यंत ८३४.६० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, विहिरींची पातळी हाताने पाणी घेण्या इतपत आली आहे, तर कारंजा तालुक्यातील जानोरी येथील अविनाश भिंगारे यांच्या शेतातील कूपनलिका विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहत आहे.
कारंजा तालुक्यातील जानाेरी गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत विविध जलसंधारणाची कामे केली. त्यात कारंजा तालुक्यात गत काही दिवसांत दमदार पाऊसही पडला. विशेष करून जानाेरी परिसरात पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे या परिसरातील जलस्त्रोत काठोकाठ भरले असून, समृद्ध गाव स्पर्धेत जलसंधारणाची कामे करण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करणारे ग्रामपंचायत सदस्य अविनाश भिंगारे यांच्या शेतातील कूपनलिका विना मोटारपंपाचीच ओसंडून वाहत आहे. मोटारपंपात बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी काढले असता कूपनलिकेतून सतत पाणी वाहण्यास सुरुवात झाली. कूपनलिकेतून पाणी सतत ओसंडून वाहत आहे.