उभ्या ट्रॅक्टरला व्हॅनची धडक; ५ जण जागीच ठार, वाशिम-शेलूबाजार मार्गावरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 23:05 IST2022-02-15T23:04:53+5:302022-02-15T23:05:19+5:30
आठ जण गंभीर जखमी

उभ्या ट्रॅक्टरला व्हॅनची धडक; ५ जण जागीच ठार, वाशिम-शेलूबाजार मार्गावरी घटना
वाशिम: नागपूर येथून लग्न आटोपून परत येत असलेल्या मॅक्सीमो व्हॅनने उभ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातात व्हॅनचा अक्षरश: चुराडा होऊन ५ चार जण ठार, तर ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना वाशिम-शेलुबाजार मार्गावर सोयता फाट्यानजिक मंगळवार १५ फेब्रुवारीला रात्री ९ वाजताच्या सुुमारास घडली.
वाशिम तालुक्यातील सावंगा जहॉगिर येथील मंडळी नागपूर येथून लग्न आटोपून एमएच ४८, पी- १४४५, क्रमांकाच्या व्हॅनने गावी परत येत होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास शेलुबाजार-वाशिम मार्गावर सोयता फाट्यानजिक चालकाचे नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली ही व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यामुळे व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. यात मृतक भारत गवळी (४०), सम्राट भारत गवळी (१२), पुनम भारत गवळी (३७) आणि इतर दोन मिळून पाच जण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य आदित्य इंगोले, ओम वानखडे, राहुल साखरे, नयन राठोड आणि ऋषिकेश येवले, तसेच पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे त्यांच्या पथकातील रुग्ण वाहिकेसी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोन १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. पोलीस अधीक्षक बच्चनसिंगही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक
अपघातात जखमी झालेल्या आठ जणांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वाशिम येथे उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविल्याची माहिती मिळाली आहे.
एकाच परिवारातील तीन ठार
वाशिम-शेलुबाजार मार्गावर घडलेल्या अपघातात जागेवर ठार झालेल्या चार जणांत एकाच परिवारातील पती, पत्नी आणि एका लहान मुलांसह तिघांचा समावेश होता.