संचारबंदीतही सावरगाव परिसरात वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:00 IST2021-05-11T18:00:40+5:302021-05-11T18:00:59+5:30
Washim News : सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे.

संचारबंदीतही सावरगाव परिसरात वृक्षतोड
मानोरा : मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सावरगाव कान्होबा या गावाला लागून असलेल्या परिसरात संचारबंदी व कोरोनाकाळाती बेसुमार वृक्षतोड होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींमधून मंगळवारी करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच वृक्षारोपण मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च करून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वनतस्करांकडून कुºहाड चालविली जात असल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सावरगाव कान्होबा गावाला लागून असलेल्या कोळंबी या गावचे वनतस्कर हे सावरगाव वनपरिक्षेत्रातील अनमोल आणि मोठ्या आकाराच्या सागवान, कडूनिंब, चंदन आणि आडजातीचे झाडे दिवसाढवळ्या व रात्रीही मोठ्या प्रमाणात तोडून बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक करीत असल्याचे चित्र संचारबंदीतही दिसून येत आहे. सावरगावातून तोडलेल्या झाडांच्या बैलगाड्या राजरोसपणे नेत असताना वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सावरगाव कान्होबा येथे नियुक्तीला असलेले काही वन कर्मचारी हे दुरच्या तालुक्यातून अपडाऊन करीत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होत आहे.