‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By संतोष वानखडे | Updated: May 15, 2024 16:08 IST2024-05-15T16:08:14+5:302024-05-15T16:08:48+5:30
मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
वाशिम : मे महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असल्याने उन्हाळी पिकांना जबर फटका बसत आहे. मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.
जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी रब्बी हंगामानंतर उन्हाळी पिकांना पसंती देतात. यंदा उन्हाळी पीक पेऱ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ५९५४.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात ७९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमुग, उन्हाळी मुग व उडीद, सोयाबीन, ज्वारी, तीळ, मका या पिकांवर शेतकऱ्यांचा भर अधिक होता. यंदा उन्हाळ्यात मार्च ते १३ मे पर्यंत अधूनमधून गारपिट, वादळवारा व अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांना फटका बसला. १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास वाशिमसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह फळबागेलाही फटका बसला.
मालेगाव तालुक्यात जवळपास दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने मूग पिकाची प्रचंड नासाडी झाली. पांगरी नवघरे परिसरात शेतात कापणी करून ठेवलेले मूग पीक संपूर्णत: भिजले. कापणी करून ठेवलेल्या या मूग पिकाच्या गंजीला १५ मे रोजी शेतकऱ्यांनी फेरबदल करीत पीक वाचविण्यासाठ धावपळ केल्याचे दिसून आले. वादळवाऱ्यामुळे मालेगाव ते वाशिम या महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने रात्रीच्या सुमारास काही वेळेसाठी वाहतूकही प्रभावित झाली होती.
नैसर्गिक आपत्ती पिच्छा सोडेना
खरीप हंगामात पावसात सातत्य नसते. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसतो. रब्बी हंगामात गारपिट व अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसतो. गत दोन वर्षांत उन्हाळी हंगामातदेखील अवकाळी पाऊस येत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. नैसर्गिक आपत्तीदेखील पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
नुकसानभरपाई मिळणार केव्हा?
मागील तीन महिन्यांत गारपिट, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानभरपाईची रक्कम केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.