सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:35 IST2021-06-01T11:34:47+5:302021-06-01T11:35:30+5:30

Tenth result of all schools is one hundred percent : पुढील प्रवेश नेमके कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

Tenth result of all schools is one hundred percent! | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात ३६३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, आता पुढील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. 
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा रद्द झाली. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट १९,७१५ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येतील. 


असे असेल नवे सूत्र
नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मुल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून  अंतिम निकाल जाहिर केला जाणार आहे. दहावीतील अंतर्गत मुल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनाला ३० गुण तर गृहपाठ/ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार .


विद्यार्थी खूश!
कोरोनामुळे यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी खूश असल्याचे दिसून येते तर काही विद्यार्थी मात्र या निर्णयावर नाखूश असल्याचे दिसून येते. पुढील प्रवेश नेमके कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.


कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला. गुणांकनाचे सूत्रही शिक्षण विभागाने जाहिर केले. दहावीनंतरचे पुढील प्रवेश हे सीईटीनुसारच होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- गजानन डाबेराव,
शिक्षण तज्ज्ञ.

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent!