पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड : घरोघरी जाऊन जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:44 IST2019-03-22T15:43:51+5:302019-03-22T15:44:45+5:30
पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड : घरोघरी जाऊन जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या दाभडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत शहरांसोबतच ग्रामीण भागांतही कॉन्व्हेंट संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. आसेगाव येथून जवळच असलेल्या दाभडी जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्वच धोक्यात आले असून, शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी ग्रामस्थांत जनजागृती मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. बुधवार २० मार्चपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत गावात मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घरोघरी भेटी दिल्या. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसह पालकांच्या संवाद सभेचे आयोजन करून चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात दाभडी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दंडे आणि शिक्षकांसह प्रतिष्ठीत ग्रामस्थ राजु महल्ले, ग्रामपंचायत सदस्य संजय ठाकरे, महादेव ठोके, सुमित साखरे, तुळशीराम जाधव, ज्ञानेश्वर महल्ले, रामदास भगत, मिलिंद सोनोने, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष गणेश महल्ले, प्रहार जनशक्ति संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर महल्ले आदिंनी सहभाग घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला.