मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:30 PM2020-07-19T18:30:10+5:302020-07-19T18:30:20+5:30

नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Tanker water supply in Manora city even during rains! | मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: मानोरा शहराला पाणीपुरवठा करणारी नळयोजना सद्यस्थितीत बंद असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न म्हणून नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
मानोरा ग्रामपंचायतचे रुपांतर पाच वर्षांपूर्वी नगर पंचायतमध्ये झाले. नगर पंचायत अस्तित्वात आलेली असतानाही, शहरवासियांना फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पाणी, वीज यासह आवश्यक त्या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत येत असलेल्या २८ गावे पाणीपुरवठा योजनेत मानोरा शहर समाविष्ठ करून पुरक पाणीपुरवठा योजना काही वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. या योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठाही झाला. परंतू, पाईपलाईनला गळती, नादुरूस्ती, पाईप फुटणे आदी कारणांमुळे पाणीपुरवठा ठप्प असतो. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असताना, पाणीपुरवठा योजनेचे पाईप फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. जवळपास एका वर्षापासून ही समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. मध्यतंरी पाणीपुरवठा पुर्वत करण्यासाठी नविन पाईप टाकण्याचे काम चालू होते. मात्र ते सुध्दा बंद झाले आहे. आता तर पाणीपुरवठा ठप्पच आहे. पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करावी लागते. नगर पंचायतने पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. नागरीकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळते. भर पावसाळ्यातही नागरीकांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा योजना पूर्ववत करावी, अशी मागणी शहरवासिंयानी केली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, ज्या विहिरीच्या जलपातळीत वाढ झाली, तेथून टँकरने पाणी आणले जात आहे. पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याची चर्चा असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी नेमके कुठून आणले जाते, याची खातरजमा होणेही आवश्यक आहे.

Web Title: Tanker water supply in Manora city even during rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.